ठाकरे सरकारच्या दिरंगाईमुळे १७ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना मिळतोय कामाविना फुल पगार!
By जमीर काझी | Published: September 27, 2020 07:36 PM2020-09-27T19:36:51+5:302020-09-27T19:38:52+5:30
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे. तोपर्यंत त्याबाबत एकमत होणार की त्यासाठी मुदतवाढीचा आणखी 'फार्स ' केला जाणार?, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे.
जमीर काझी
मुंबई - कोरोनाच्या महामारीत सरकारी तिजोरीत खडखडाटामुळे शासनाने एकीकडे विकास कामावर निर्बंध लादली असताना राज्यातील 17 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना मात्र कसल्याही जबाबदारीविना त्यांच्या वेतनापोटी कोट्यवधी खर्च करीत आहे. बदलीनंतर त्यांची इतरत्र नियुक्ती न केल्याने त्यांना प्रतीक्षेत राहून पूर्ण पगार मिळत आहे.
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत बदल्या करण्यासाठीची मुदत आहे. तोपर्यंत त्याबाबत एकमत होणार की त्यासाठी मुदतवाढीचा आणखी 'फार्स ' केला जाणार?, याबाबत पोलीस वर्तुळात चर्चा सुरु आहे. आयपीएस दर्जाचे अधिकारी इतक्या मोठया प्रमाणात एकाचवेळी 'वेटिंग 'वर राहण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यंदा पोलिसांच्या बदल्याना पहिल्यांदा 2 सप्टेंबरला 'मुहूर्त ' मिळाला. त्यावेळी सहा अधिकाऱ्यांना नियुक्तीविना कार्यरत असलेल्या पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर 17 सप्टेंबरला एक अधिकारी वगळता इतरांना पोस्टिंग देण्यात आले.परंतु त्याचवेळी 16 वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटविले. मात्र त्यांना अन्यत्र नियुक्ती न देता प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे. सरकारमधील तीनही पक्षाचे नेत्यातील एकमत आणि पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची संमती मिळेपर्यत या सर्वांना 'विना काम फुल पगार मिळत राहणार आहे.
वास्तविक 17 नव्हे 18 आयपीएस अधिकारी पोस्टिंग करावयाची आहे. एटीसचे प्रमुख देवेन भारती यांची 2 सप्टेंबरला बदलीचा आदेश काढण्यात आला. मात्र त्याची नवीन नियुक्तीचे ठिकाण दाखविले नाही, त्याचप्रमाणे त्याच्या जागेवर अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती केली नसल्याने तेच अद्याप एटीएसचा कार्यभार सांभाळीत आहेत. त्याचवेळी बदली झालेले मुंबईतील सहआयुक्त (प्रशासन ) नवल बजाज यांनाही अद्याप पदोन्नती दिलेली नाही त्यांची व मागील सरकारच्या काळात बाजूला असलेल्या फ़ोर्सवनचे प्रमुख सुखवीदर सिंग याची एटीएसमध्ये नियुक्ती केली जाण्याची चर्चा आहे.
डीजी गॅझेटही प्रलंबित
17 आयपीएस अधिकाऱ्यांबरोबरच अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक यांच्या आणि महासंचालक कार्यालयतून होणाऱ्या निरीक्षक, एपीआय, पीएसआयच्या बदल्या 30 सप्टेंबरपर्यंत काढल्या जाणार का, याबाबत संदिग्धता आहे. त्यांच्यानंतर आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातील बदल्या होतील, मात्र सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुस्ताईमुळे गरजू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.
हे अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत
अप्पर महासंचालक प्रशांत बुरडे ( होमगार्ड ), सहआयुक्त नवल बजाज (प्रशासन ), विशेष महानिरीक्षक कैसर खालिद (पीसीआर), शिवाजी राठोड (ठाणे ग्रामीण ), अखिलेशकुमार सिंग (अहमदनगर ), पंजाबराव उगले ( जळगाव ) सुहेल शर्मा (सांगली ), एस चेतन्य ( जालना ) हर्ष पोतदार ( बीड ), विजय मगर ( नांदेड ), कृष्णकात उपाध्याय ( परभणी ), योगेशकुमार गुप्ता ( हिंगोली ), बावराज तेली ( वर्धा ), एमसीव्ही महेशवर रेड्डी (चंद्रपुर ), मंगेश शिंदे ( गोदीया ), एम राजकुमार ( यवतमाळ), व राजेंद्र माने(लातूर )