शासनाकडे दूध अनुदानाचे १७१ कोटी अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:13 PM2019-07-02T16:13:12+5:302019-07-02T16:14:20+5:30
दर घसरल्याने सुरू केलेले अनुदान बंद; पश्चिम महाराष्ट्रातील २२ दुध संघांचा समावेश
सोलापूर: दर घसरल्याने सुरू केलेले अनुदान बंद करून दोन महिने झाले तरी अनुदानाची मागील १७१ कोटी इतकी रक्कम शासनाकडे अडकली आहे. एकट्या पश्चिम महाराष्टÑातील सहकारी व खासगी अशा २२ दूध संघांची ही रक्कम आहे.
दूधदर घसरल्याने राज्य शासनाने एक आॅगस्टपासून गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यास सुरुवात केली. बाजारात दुधाच्या दरात वाढ होत नसल्याने शासनाने सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू ठेवले. देशात व राज्यात दूध संकलनात घट होऊ लागल्याने राज्य शासनाने दूध संघांना २० ऐवजी २२ रुपये दर देण्याचे आदेश काढले. याच आदेशात दूध संघाने २२ रुपये व शासन प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देणार असल्याचे म्हटले होते. सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये व नंतर तीन महिने तीन रुपये, याप्रमाणे अनुदान जाहीर केले व एप्रिलपासून संपूर्णपणे अनुदान बंद केले. शासनाने एप्रिलपासून अनुदान बंद केल्यानंतर मे महिन्यापासून दूध खरेदी दरात वाढ होऊ लागली. ती वाढ सध्या सुरूच आहे. दरम्यान, शासनाकडून मिळणारी अनुदानाची ररक्कम अद्यापपर्यंत मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम महाराष्टÑातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा व सांगली जिल्ह्यांमधील २२ संघांना आॅगस्ट ते जानेवारीपर्यंतचे ३४७ कोटी रुपये अनुदान वितरित केले आहे. जानेवारीपर्यंतचे ६३ कोटी रुपये शासनाकडून अद्याप मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत १९ संघांचे प्रतिलिटर तीन रुपयांप्रमाणे १०८ कोटी रुपये शासनाकडून येणे आहे. तीन रुपये अनुदान सुरू झाल्यानंतर गोकुळ, वारणा व यशवंत सहकारी दूध संघांनी शासनाचे अनुदान नाकारले. त्यामुळे अनुदान घेणाºया दूध संघांची संख्या १९ इतकी झाली.
दूध पंढरीचे साडेचार कोटी
- सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (दूध पंढरी) शासन आदेशाप्रमाणे सहा महिने प्रतिलिटर पाच रुपये व नंतर तीन महिने प्रतिलिटर तीन रुपयांप्रमाणे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहे. शासन आदेशाप्रमाणे गायीच्या दुधाला २५ रुपयांचा दर दिला आहे. असे असले तरी दूध पंढरीला २० डिसेंबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. साडेचार महिन्यांचे साडेचार कोटी रुपये अनुदान शासनाकडून आले नसल्याचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मुळे यांनी सांगितले.
शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यातील सहकारी दूध संघांनी दूध उत्पादकांना अनुदानासह प्रतिलिटर २५ रुपये इतका दर दिला. शासनाकडून अनुदान अद्यापही मिळाले नाही. मात्र, बहुतेक खासगी संघांनी दूध उत्पादकांना २० रुपये, २२ रुपये प्रतिलिटर व काहींनी २५ रुपये इतका दर दिला. कमी दर देणाºया खासगी संघांवर शासनाचे नियंत्रण नाही.
- विनायक पाटील
संचालक, महानंद, मुंबई