राज्यात ११ महिन्यांत १७३ बिबट्यांचा मृत्यू; ‘रोड किल’चे वनविभागासमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:51 AM2020-12-15T04:51:01+5:302020-12-15T06:43:20+5:30
नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचा भाग असलेल्या नाशिक वनवृत्तात सर्वाधिक ७० बिबट्यांचा बळी
- अझहर शेख
नाशिक : राज्यात गेल्या अकरा महिन्यांत रस्ते अपघात, विहिरीत पडून, तसेच शिकार आदी कारणांमुळे तब्बल १७३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहेत. त्यात नाशिक व अहमदनगर जिल्ह्याचा भाग असलेल्या नाशिक वनवृत्तात सर्वाधिक ७० बिबट्यांचा बळी गेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा राज्यात ६३ बिबट्यांचा अधिक मृत्यू झाला आहे.
राज्यात मागील वर्षी ११० बिबटे मृत्युमुखी पडले होते. यामध्ये नाशिक वनवृत्तातील ३९ बिबट्यांचा समावेश होता. हा आकडा राज्यात उच्चांकी होता. या वर्षीही नाशिक वनवृत्तामधील बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षीच्या ३९च्या तुलनेत नोव्हेंबरअखेरीस ३१ बिबटे अधिक मृत्युमुखी पडले आहेत. यंदाचे वाढते मृत्यू चिंतेची बाब मानली जात आहे.
नाशिकपाठोपाठ पुण्याचा क्रमांक
नाशिक वनवृत्तात सुमारे ७० बिबटे यंदा नोव्हेंबरपर्यंत मृत्युमुखी पडल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत, तर कोल्हापूरमध्ये २६ आणि धुळ्यात १० बिबटे गतप्राण झाले.