राज्यातील १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या!
By admin | Published: May 24, 2017 03:17 AM2017-05-24T03:17:38+5:302017-05-24T03:17:38+5:30
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १७५ साहाय्यक निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील २५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस मुख्यालयातून सोमवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. येत्या काही दिवसांत ४०० हून अधिक उपनिरीक्षकांच्या बदल्या तर सुमारे ७०० एपीआयना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सूत्रानी सांगितले.
सध्याच्या ठिकाणी मुदत पूर्ण होऊनही बदली न करण्याची विनंती केलेल्या ८८ अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढदेखील दिली आहे.
महाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ न (१) अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक दोनने राज्यातील विविध पोलीस अधीक्षक, आयुक्तालये आणि अन्य विभागांतील कार्यकाळ पूर्ण झालेल्या १७५ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात मुंबई आयुक्तालयातील आठ तर नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील १५ हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदलीसाठीचा कार्यकाळ पूर्ण होऊनही वैयक्तिक, कौटुंबिक कारणास्तव सध्याच्या ठिकाणी विनंती केलेल्यांपैकी ८८ अधिकाऱ्यांची विनंती मान्य केली आहे. त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. खात्यांतर्गत राज्य लोकसेवा आयोग व सरळसेवेतून भरती झालेल्या अधिकाऱ्यांपैकी साहाय्यक निरीक्षकांच्या सेवा ज्येष्ठता व पदोन्नतीचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता. त्याबाबत ‘मॅट’ने दिलेल्या निर्देशानुसार येत्या काही दिवसांत ७०० एपीआयना पदोन्नती देण्यात येणार आहे, असे मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.