उल्हासनगरातील विकास कामासाठी १७६ कोटीचा निधी; शहरातील रस्ते होणार चकाचक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 06:11 PM2021-08-27T18:11:27+5:302021-08-27T18:12:51+5:30
शहरातील विविध रस्ते व क्रीडासंकुलसाठी १७६ कोटींचा निधी शासनाकडून महापालिकेला मिळाल्याची माहिती महापौर कार्यालयात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे व अरुण अशान यांनी दिली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील विविध रस्ते व क्रीडासंकुलसाठी १७६ कोटींचा निधी शासनाकडून महापालिकेला मिळाल्याची माहिती महापौर कार्यालयात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे व अरुण अशान यांनी दिली. महापालिका निवडणुकी पूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचा विश्वास धनंजय बोडारे यांनी व्यक्त केला.
उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात होणार असून सत्ताधारी शिवसेनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शासनाकडून विविध विकास कामासाठी आलेल्या निधीची माहिती महापौर लिलाबाई अशान यांच्या कार्यालयात शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, अरुण अशान यांनी दिली. शासन व एमएमआरडीए अंतर्गत १०१.८२ कोटीच्या निधीतून मोर्यानगरी ते व्हीनस चौक रस्त्यासाठी ५२.११ कोटी, डॉल्फिन हॉटेल ते ए ब्लॉक २६.०२ कोटी, सोनार रस्ता ते कोयंडे पुतळा ७.११, हिराघाट ते ड्रबी हॉटेल ४, पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता १२.५० कोटी आदी रस्ते बांधण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच यापूर्वी ४९.७८ कोटी विविध रस्त्यासाठी व व्हिटीसी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने २५ कोटीच्या निधीतून क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी सर्व विकास कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती अरुण अशान यांनी यावेळी दिली.
शहरातील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे असून उर्वरित ३० टक्के रस्ते लवकरच सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत. शहर खड्डेमुक्त करण्याचा मानस शिवसेनेचा असल्याची माहिती अरुण अशान म्हणाले. महापालिका निवडणुकी पूर्वी शहर विकासासाठी मोठा निधी आणणार असल्याचे संकेत त्यांनी पत्रकार परिषदेत दिले. पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, दिलीप गायकवाड आदीजन उपस्थित होते. १७६ कोटीच्या निधीतून विकास कामे निवडणुकीपूर्वी होणार असून शिवसेनेने करून दाखविले. असे धनंजय बोडारे म्हणाले.