अमरावती विभागात १.७८ लाख टन उसाचे गाळप!
By admin | Published: January 28, 2016 08:57 PM2016-01-28T20:57:42+5:302016-01-28T20:57:42+5:30
पश्चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका.
ब्रह्मनंद जाधव/मेहकर (बुलडाणा): पश्चिम विदर्भात यावर्षी ऊस उत्पादकांना दुष्काळाचा फटका बसला असून, राज्यात झालेल्या ४४३.0४ लाख क्विंटल साखरेच्या उत्पादनापैकी केवळ १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन अमरावती विभागात झाले आहे. राज्यात ४१५.९७ लाख टन तर अमरावती विभागात १.७८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.
पश्चिम विदर्भात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत घटले आहेत. या दुष्काळी परिस्थितीचा फटका ऊस उत्पादकांना बसला आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उस उत्पादन घटले असून, सध्या १७३ साखर कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये ९६ सहकारी व ७७ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात यंदा ४१५.९६ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्याच्या एकूण ऊस गाळपापैकी सर्वात कमी ऊस गाळप अमरावती विभागात झाले आहे. अमरावती विभागामध्ये केवळ १.७८ लाख टन उसाचे गाळप व १.६८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. नागपूर विभागात २.९0 लाख टन उसाचे गाळप व २.७४ लाख क्विंटल उत्पादन झाले आहे.
विदर्भातील ऊस मराठवाड्यात
अमरावती विभागातील जमिनी कोरडवाहू असल्याने येथे उसाचे क्षेत्रही मुळातच कमी आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे प्रमाणही बोटावर मोजता येईल एवढे आहे. मराठवाडा, खान्देशपेक्षा कमी भाव असल्याने पश्चिम विदर्भातील ऊस मराठवाडा खान्देशमधील साखर कारखान्यांमध्ये जात आहे.
साखर उतार्यात विदर्भाचा टक्का ९.४६ टक्के
राज्यात ४४३.0४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, सरासरी १0.६५ टक्क्यांच्या उतार्याने हे उत्पादन आहे. पुणे विभागात १0.५१ टक्के, अहमदनगर विभाग १0.३४ टक्के व राज्यातील इतर विभागही याचबरोबरीने आहेत; परंतु साखर उतार्यात विदर्भाचा टक्का घसरला असून, विदर्भातील अमरावती विभाग व नागपूर विभागात ९.४६ टक्केच साखर उतारा आहे.