कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल, १६ जुलैपर्यंत मुदत वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 09:15 AM2018-06-16T09:15:20+5:302018-06-16T09:15:20+5:30

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत.

177 affidavits submitted to the Coorga Bhima inquiry commission, up to 16th July | कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल, १६ जुलैपर्यंत मुदत वाढविली

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे १७७ शपथपत्रे दाखल, १६ जुलैपर्यंत मुदत वाढविली

Next

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे आतापर्यंत १७७ शपथपत्रे विविध व्यक्ती, संघटनांनी दाखल केली आहेत.  शपथपत्र दाखल करण्यासाठी आयोगाने मुदत वाढवून दिली असून आता १६ जुलैपर्यंत लोकांना तसेच संघटनांना शपथपत्रे आयोगाकडे सादर करता येतील. 
कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी शासनाने चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जे़ एऩ पटेल आणि राज्याचे मुख्य सचिव यांची चौकशी समिती फेबु्रवारी महिन्यात नेमण्यात आली आहे. या समितीला चार महिन्यात चौकशी करुन अहवाल द्यायचा आहे़ 
चौकशी आयोगाने १२ मे रोजी जाहीर आवाहन करुन ती घटना, त्या घटनेपूर्वीच्या आणि त्यानंतरच्या अशा इतर संबंधित घटना या बद्दलची व्यक्तीगत माहिती असलेल्या व्यक्ती, त्या घटनेमुळे बाधित झालेल्या व्यक्ती तसेच संघटना, राजकीय पक्ष यांच्याकडून शपथपत्राच्या स्वरुपात त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यासाठी १० जूनपर्यंत मुदत होती. या मुदतीत आयोगाकडे पुणे कार्यालयात १६९ शपथपत्रे तर मुंबईतील कार्यालयात ८ शपथपत्रे सादर झाली.
मुदतीत शपथपत्र सादर करता आले नसल्याने मुदत वाढवून देण्यासाठी मागणी अनेकांनी केली. ही मागणी लक्षात घेऊन आयोगाने निवेदन सादर करण्याची मुदत १६ जुलै २०१८ पर्यंत वाढविली आहे. ज्यांना अजूनही आपले म्हणणे सादर करायचे आहे, ते या एक महिन्याच्या कालावधीत ते सादर करु शकतात, असे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे सचिव वि़ वी़ पळणीटकर यांनी जाहीर केले आहे. 
कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. जे. एन. पटेल यांना विनंती करून त्यांच्या अध्यक्षतेत कमिशन ऑफ इन्क्वायरी अ‍ॅक्ट अंतर्गत दोन सदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या समितीला चौकशीसाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमीमांसा करणे, ही घटना घडविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या काय हे शोधणे, या घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय याचा आढावा घेणे तसेच ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती काय आदींची चौकशी ही समिती करणार आहे.

Web Title: 177 affidavits submitted to the Coorga Bhima inquiry commission, up to 16th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.