बालकांविरोधातील १७७ गुन्हे उघडकीस
By admin | Published: February 16, 2015 03:26 AM2015-02-16T03:26:11+5:302015-02-16T03:26:11+5:30
पोलीस ठाण्यात लहान मुलांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलेल्या चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटच्या
पंकज रोडेकर, ठाणे
पोलीस ठाण्यात लहान मुलांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांना वेळीच आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी सुरू केलेल्या चाइल्ड्स प्रोटेक्शन युनिटच्या माध्यमातून ठाणे पोलिसांनी गेल्या २१२ दिवसांत बालविवाह, बालमजूर, बालभिक्षेकरी आणि अपहरण यासारखे १७७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. दिवसाला सरासरी एका बालगुन्ह्याचा छडा लागत असल्याचे समोर येते.
लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी १७ जुलै रोजी हे युनिट स्थापन केले. तेव्हापासून १४ फेब्रुवारीपर्यंत या युनिटने १७७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये सर्वाधिक ११९ अपहरण/ मिसिंगचे गुन्हे आहेत. त्यापाठोपाठ बालभिक्षेकरी- ३८, बालमजूर- २० आणि बालविवाह व बलात्काराच्या प्रत्येकी एक ा गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यामध्ये बालविवाह आणि बलात्कार या गुन्ह्यांत त्यांच्या पालकांचा समावेश प्रामुख्याने दिसतो. हे गुन्हे उघडकीस आणल्यावर तज्ज्ञ मंडळामार्फत त्या मुलांसह त्यांच्या पालकांच्या समुपदेशन केले जाते आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो.