लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:30 AM2020-07-27T06:30:22+5:302020-07-27T06:30:33+5:30

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागाच्या आॅनलाइन मेळाव्यांसह महास्वयम वेबपोर्टलमुळे झाले शक्य

17,715 unemployed get employment in lockdown | लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

लॉकडाऊनमध्ये १७,७१५ बेरोजगारांना मिळाला रोजगार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असतानाही मागील ३ महिन्यांत कौशल्य विकास विभागाने आॅनलाइन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत तब्बल १७ हजार ७१५ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. या कालावधीत कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यासपीठांवर १ लाख ७२ हजार १६५ बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी दिली.


मलिक म्हणाले की, ‘बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने वेबपोर्टल सुरू केले आहे. त्यावर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हेसुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. मागील ३ महिन्यांत एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर १ लाख ७२ हजार १६५ इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली.


यामध्ये मुंबई विभागातील २४,५२०, नाशिक ३०,१४५, पुणे ३७,५६२, औरंगाबाद ३५,२४३, अमरावती १४,२६० तर नागपूर विभागातील ३०,४३५ उमेदवार आहेत. यापैकी १७,१३३ उमेदवारांना नोकरी मिळविण्यात यश आले. यात मुंबई विभागातील ३,७२०, नाशिक ४८२, पुणे १०,३१७, औरंगाबाद १,५६९, अमरावती १,०२२ तर नागपूर विभागातील २३ उमेदवार आहेत. याशिवाय सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून ५८२ उमेदवारांना रोजगार मिळवून दिला.

आॅनलाइन मुलाखतींना प्राधान्य
कौशल्य विकास विभागाने तीन महिन्यांत राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय आॅनलाइन रोजगार मेळाव्यांची मोहीम सुरू केली आहे. जिल्हास्तरावर २४ आॅनलाइन रोजगार मेळावे झाले असून त्यात १६७ उद्योजक सहभागी झाले होते. त्यांच्याकडील १६,११७ जागांसाठी आॅनलाइन मुलाखती झाल्या. या मेळाव्यांमध्ये ४०,२२९ तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत २,१४० तरुणांना रोजगार मिळाला.

Web Title: 17,715 unemployed get employment in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी