बहादूरगडावर सापडले १७व्या शतकातील शिल्प
By admin | Published: November 4, 2015 02:24 AM2015-11-04T02:24:22+5:302015-11-04T02:24:22+5:30
अहमदनगर येथील बहादूर गडावरील खजिना शोधण्यासाठी आलेल्या चोरट्यांना एका बौद्ध भिक्षूंचे लाकडी शिल्प सापडले. त्यांनी हे शिल्प तेथील झाडीत फेकून दिले. परंतु, गडप्रेमींनी हे शिल्प
पुणे : अहमदनगर येथील बहादूर गडावरील खजिना शोधण्यासाठी आलेल्या चोरट्यांना एका बौद्ध भिक्षूंचे लाकडी शिल्प सापडले. त्यांनी हे शिल्प तेथील झाडीत फेकून दिले. परंतु, गडप्रेमींनी हे शिल्प राज्याच्या पुरातत्त्व विभागाकडे सोपविले असून तज्ज्ञांकडून त्याचा अभ्यास केला जात आहे. ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी हे शिल्प सतराव्या किंवा अठराव्या शतकातील चिनी कलाकृती असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.
देगलूरकर म्हणाले, अहमदनगर येथील पेडगाव आता बहादूरगड या नावाने ओळखले जाते. या किल्ल्याचा सरदार बहादूर खान हा औरंगजेबाचा नातेवाईक होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला पळवून लावले. त्याकाळात किल्ल्यावर लाकडी वाडे होते. याच वाड्यातील हे शिल्प असावे.
कमानीकृती भुवयांतून पुढे आलेले नाक, मोठ्या पापण्या आणि मोठे कान यावरून हे शिल्प चिनी असावे, असे वाटते.
पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागीय सहाय्यक संचालक विलास वाहणे म्हणाले, प्रथम दर्शनी हे शिल्प तिबेटीयन किंवा चिनी बनावटीचे दिसून येते. मात्र, त्याचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी आम्ही डेक्कन कॉलेजमधील अभ्यासक श्रीकांत गणवीर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मुंबई येथील लाकडी शिल्पाच्या तज्ज्ञ अभ्यासकांकडून मूर्ती संदर्भातील माहिती जाणून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. (प्रतिनिधी)