सीईटीपीतील सक्षम यंत्रणेसाठी १८ कोटी
By admin | Published: June 13, 2016 04:34 AM2016-06-13T04:34:49+5:302016-06-13T04:34:49+5:30
लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे.
श्रीकांत चाळके,
खेड- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे. अशा पाणीप्रदूषित परिसरातील गावांमध्ये काही लोकांना कॅन्सर झाला असल्याचे पुढे येत आहे. गेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरी राहिला असून, याबाबत आपण सीईटीपी तसेच टाटा कॅन्सर रिसर्च आणि डेरवण रूग्णालयाच्या कॅन्सर विभागप्रमुखांशी चर्चा करून संबंधितांची तपासणी करण्यासाठी सहकार्य करू, असे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. लोटे येथील सीईटीपीची सध्याची क्षमता कमी असल्याने ती वाढवून सक्षम यंत्रणा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. त्याकरिता १८ कोटी रूपये खर्चाला अनुमती मिळणार असल्याची माहिती माने यांनी दिली आहे.
खेड येथील अनिकेत शॉपींग सेंटरमध्ये आयोेजित पत्रकार परिषदेत बाळ माने बोलत होते. खेड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने खेड शहरासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि खेड भाजपचे पदाधिकारी आबा जोशी, अॅड. मिलिंद जाडकर, खेडचे माजी तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रमेश भागवत, तालुकाध्यक्ष नाना चाळके, अॅड. संदेश चिकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खेड शहरासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १३ कोटी रूपये खर्चाची सुजल पाणीपुरवठा योजना आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण ही दोन कामे भाजपच्या अजेंड्यावर असून, यासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती दिली.
>कॅन्सरची लागण : मुख्यमंत्र्यांशी बोलणार
गेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरीत राहिला आहे.
सीईटीपी, टाटा कॅन्सर रिसर्च, डेरवण रूग्णालयाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करणार.
लोटे एमआयडीसीतील प्रदूषित पाण्यामुळे खाडीपट्ट्यातील नागरिकांना कॅन्सरची लागण होत असून, त्याकडे हेतूपूरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे सांगताच ही बाब गंभीर असल्याचे बाळ माने म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री तसेच अन्य संबंधितांशी बोलून करून निर्णय घेऊ तसेच संबंधित रूग्णांची तपासणी करून अशा प्रकारच्या आजाराबाबत खात्री करण्यासाठी यंत्रणेशी बोलू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
गाळाकडे लक्ष देणार
जगबुडी नदीतील गाळ काढणेचे काम गेले
३ वर्षे सुरू आहे़
लवकरच याबाबत संबंधितांशी चर्चा करून खरी परिस्थिती समोर आणू, असे त्यांनी सांगितले़