मांगी-तुंगी तीर्थक्षेत्रासाठी १८ कोटींचा निधी
By admin | Published: December 24, 2015 02:36 AM2015-12-24T02:36:02+5:302015-12-24T02:36:02+5:30
बागलाण तालुक्यातील दिगंबर जैनधर्मीयांच्या श्रीक्षेत्र मांगी-तुंगी तीर्थक्षेत्री फेब्रुवारीत होणाऱ्या भगवान वृषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक
नाशिक : बागलाण तालुक्यातील दिगंबर जैनधर्मीयांच्या श्रीक्षेत्र मांगी-तुंगी तीर्थक्षेत्री फेब्रुवारीत होणाऱ्या भगवान वृषभदेव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळ््यानिमित्त प्राधान्याने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १८ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे कामांना गती येणार आहे.
श्रीक्षेत्र मांगी-तुंगी येथे भगवान वृषभदेव यांची १०८ फुटी मूर्ती अखंड पाषाणात घडविण्यात आली असून, मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी ७ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यात मुख्यमंत्र्यांनी कामांचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने करण्यात येणाऱ्या कामांसाठी ४० कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर केला होता. उपरोक्त आराखड्यापैकी ग्रामविकास विभागाने १८ कोटी ५८ लाख रुपये उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मांगी-तुंगी पायथ्याजवळ व भिलवाड गावाजवळ शेतकऱ्यांच्या जागेवर संबंधित निधीतून तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्यात येणार असून त्यात पाणी, स्वच्छतागृह, वीज व अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
तात्पुरते शौचालय उभारणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्त्यांचे रुंदीकरण, भिलवाडपासून मांगी-तुंगी पायथ्यापर्यंत मातीकाम करणे, पोलीस चौक्या उभारणे, वैद्यकीय सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन, पोलीस निवास
व्यवस्था, स्वच्छता कर्मचारी पुरवणे, वाहनतळ, सीसीटीव्ही यंत्रणा आदी कामांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)