विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी १८ कोटी
By admin | Published: April 7, 2017 01:47 AM2017-04-07T01:47:13+5:302017-04-07T01:47:13+5:30
वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये करण्यात येतात.
मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टिकोनातून पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम’ याअंतर्गत वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते त्यांच्यावर मोफत वैद्यकीय उपचार महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये करण्यात येतात. महापालिकेने याअंतर्गत शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी सुमारे १८ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणी विभागांतर्गत असणाऱ्या ‘वैद्यकीय अधिकाऱ्यां’ना कार्यवाहीसाठी साधारणपणे १३ कोटी ४३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे कार्यरत असणाऱ्या ८ चिकित्सालयांसाठी सुमारे ५ कोटी लाख २३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकूण १८ कोटी ६६ लाखांपेक्षा अधिक रकमेची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमधून साधारणपणे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी २६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना उपचारांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये पाठवण्यात आले होते. (प्रतिनिधी)
वैद्यकीय
अधिकाऱ्यांची चमू
महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत वैद्यकीय तपासणी विभागात ‘वैद्यकीय अधिकारी (शाळा)’ यांची चमू कार्यरत असते.
हेल्थ कार्डावर नोंदली जाते माहिती
२४ डॉक्टरांचे पथक
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूद्वारे मनपा शाळांतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. तपासणीच्या नोंदी ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्वतंत्र ‘हेल्थ कार्ड’ देण्यात येते. हेल्थ कार्डमध्ये विद्यार्थ्याची जन्म तारीख, उंची, वजन यासह वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक ती सर्व माहिती वेळोवेळी नोंदविली जाते. सध्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूमध्ये २४ डॉक्टरांसह नर्स व साहाय्यक कार्यरत आहेत.
क्लिनिक कार्ड किंवा डिस्पेन्सरी कार्ड
विद्यार्थ्यांना यासाठी ‘वैद्यकीय अधिकाऱ्या’मार्फत स्वतंत्र ‘क्लिनिक कार्ड’ किंवा ‘डिस्पेन्सरी कार्ड’ देण्यात येते. या कार्डच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यावर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये मोफत
वैद्यकीय उपचार करण्यात येतात.
>शालेय आरोग्य तपासणी
शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत जून २०१६ ते ३१ मार्च २०१७ दरम्यान महापालिकेच्या शाळेतील सुमारे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
यामध्ये प्राथमिक शाळांमधील सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थ्यांचा तर माध्यमिक शाळांतील सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश होता.
४६४ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यापैकी २६ हजार ५०७ विद्यार्थ्यांना मोफत उपचारांसाठी पाठवण्यात आले. तर २८० विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले.
पाच विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया
शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या तपासण्यांदरम्यान जन्मजात हृदयरोग असणाऱ्या ५ विद्यार्थ्यांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया गेल्या वर्षी करण्यात आल्या. नेत्रदोष आढळून आलेल्या ७२४ विद्यार्थ्यांना मोफत चष्मे देण्यात आले.
आठ ठिकाणी स्वतंत्र चिकित्सालय
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सध्या ८ ठिकाणी स्वतंत्र चिकित्सालये (क्लिनिक) आहेत. हे क्लिनिक केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, डॉ. आर. एन. कूपर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय, बोरीवली येथील भगवती रुग्णालय, नायर दंत महाविद्यालय व लायन्स जुहू दंत चिकित्सालय अशा ८ ठिकाणी कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारीतील १७५ दवाखान्यांमध्ये विद्यार्थ्यांवर मोफत उपचार केले जातात.