१८ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन

By Admin | Published: September 21, 2016 02:42 AM2016-09-21T02:42:39+5:302016-09-21T02:42:39+5:30

अंधेरीच्या राजाचे १८ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर मंगळवारी दुपारी वेसावे समुद्रात विसर्जन करण्यात आले.

18 hours after immersion | १८ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन

१८ तासांच्या मिरवणुकीनंतर विसर्जन

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- अंधेरीच्या राजाचे १८ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर मंगळवारी दुपारी वेसावे समुद्रात विसर्जन करण्यात आले. मुंबईसह राज्यात सार्वजनिक गणपतींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन होते. मात्र अंधेरी राजाचे संकष्टीलाच विसर्जन करण्यात येते. यंदाचे अंधेरी राजाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.
सोमवारी सायंकाळी ७ वाजता आझाद नगरवरून सजवलेल्या ट्रकवर आरूढ झालेल्या अंधेरीच्या राजाची गुलाल उधळत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. वेसावे कोळीवाड्यात मिरवणूक आल्यावर वेसावकरांनी आणि येथील तेरे गल्ली, बुधा गल्ली, पाटील गल्ली, बाजार गल्ली, मांडवी गल्ली, डोंगरी गल्ली आणि शिव गल्लीच्या कार्यकर्त्यांनी, कोळी महिलांनीदेखील अंधेरीच्या राजाचे जोरदार स्वागत केले.
आज दुपारी एकच्या सुमारास अंधेरीच्या राजाचे सुमारे १८ तासांच्या मिरवणुकीनंतर आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक आणि पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वेसावे समुद्रात दिमाखात विसर्जन झाल्याचे आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीचे खजिनदार सुबोध चिटणीस, सहखजिनदार सचिन नायक यांनी सांगितले.
माजी नगरसेवक मोतीराम भावे यांच्या परिवाराने पूजा केल्यानंतर वेसावे येथील खोल समुद्रात येथील मांडवी गल्ली जमातीचे पंकज जोनचा, हरेश्वर घुस्ते, भरत पेदे, अलंकार चाके, जगदीश भिकरू, वीरेंद्र मासळी, अमित अंबोले, शशिकांत भुनगवले, विकास बाजीराव, गौतम कास्कर या प्रमुख कार्यकर्त्यांसह जमातीच्या सुमारे २०० कार्यकर्त्यांनी बोटीमधून वेसाव्याच्या खोल समुद्रात अंधेरीच्या राजाचे विसर्जन केले. या वेळी वेसावा कोळी जमातीचे अध्यक्ष मनिष भुनगवले, समितीचे अध्यक्ष केशव तोंडवलकर, उपाध्यक्ष महेंद्र घेडिया, सचिव विजय सावंत, प्रकाश रासकर, अशोक राणे, उदय सालियन यांची उपस्थिती
होती.
अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक आझादनगर, वीरा देसाई रोड, आंबोली, एस.व्ही. रोड, अंधेरी मार्केट, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला या विविध मार्गांवरून वेसावे येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अंधेरीच्या राजावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तर सुवासिनींनी ठिकठिकाणी ओवाळून अंधेरीच्या राजाचे स्वागत केले. अंधेरीच्या राजाच्या दर्शनानंतरच गणेशभक्तांनी संकष्टीचा उपवास सोडला. अंधेरी मार्केट परिसरात येथील अल्पसंख्याक बांधवांनीदेखील अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी पाणपोई आणि अल्पोपाहाराची सुविधा अंधेरीकर आणि येथील व्यापाऱ्यांनी उपलब्ध करून दिली होती, अशी माहिती सुबोध चिटणीस आणि सचिन नायक यांनी दिली.
>अंधेरीच्या राजाची विसर्जन मिरवणूक आझादनगर, वीरा देसाई रोड, आंबोली, एस.व्ही. रोड, अंधेरी मार्केट, राजकुमार, अपना बाजार, चार बंगला, सात बंगला या विविध मार्गांवरुन वेसावे येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. अंधेरीच्या राजावर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. तर सुवासिनींनी ठिकठिकाणी ओवाळून अंधेरीच्या राजाचे स्वागत केले.

Web Title: 18 hours after immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.