रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून १८लाखाचा गंडा
By Admin | Published: October 17, 2016 09:30 PM2016-10-17T21:30:32+5:302016-10-17T21:30:32+5:30
रेल्वेमध्ये टिकिट चेकर(टी.सी.)पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १७ - रेल्वेमध्ये टिकिट चेकर(टी.सी.)पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून तिघांची तब्बल १८ लाखाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .
गौतम शेळके (रा.किन्ही,ता,सोयगाव), सचिन पवार (रा.मयुरपार्क), वेदप्रकाश दुबे (रा. भोपाळ) आणि शैलेश खान (रा. कोलकोत्ता) अशी आरोपींची नावे आहेत. पो.निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, नारेगावचे रहिवासी सुनील नवघरे हे रिक्षाचालक आहेत. आरोपी गौतम शेळके हा फिर्यादीच्या गावातील रहिवासी आहे. यामुळे त्यांच्यात जुनी ओळख आहे. नवघरे यांची पत्नी बेरोजगार आहे. दोन वर्षापूर्वी आरोपी शेळके हा नवघरे यांना भेटला आणि तुझ्या पत्नीला रेल्वेमध्ये नोकरी लावू शकतो, त्यासाठी ६ लाख रुपये लागतील असे सांगितले. गावचा माणूस असल्याने नवघरे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यांनी पैश्याची जमवाजमव केल्यानंतर आरोपीशी संपर्क साधला. आरोपी त्यांच्या घरी गेला.
तेथे त्यांच्याकडून आणि भारतभूषण खंदारे, अमोल पवार यांच्याकडून प्रत्येकी ७० हजार रुपये असे एकूण २ लाख १० हजार रुपये घेतले. ही रक्कम परीक्षेचे हॉलतिकिट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी घेतल्याचे आरोपींनी सांगितले. काही दिवसानंतर शेळके, पवार आणि दुबे हे तिघे नारेगावातील घरी गेले. तेथे त्यांनी हॉलतिकिट व वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. उर्वरित रक्कम कोलकोत्ता येथील शैलेश खान यांच्याकडे द्यावी लागेल असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या सुरवातीला १५ लाख ९० हजार रुपये तेथे नेऊन दिले.
बोगस ट्रेनिंग आणि नियुक्तीपत्रे
आरोपींनी तक्रारदार यांच्या पत्नीसह तीन जणांना कोलकोत्ता येथे तीन महिने ट्रेनिंगसाठी ठेवले. तेथे त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर आरोपींनी त्यांना बोगस नियुक्तीपत्रेही दिली. ही नियुक्तीपत्रे देऊन त्यांना बिहारची राजधानी पाटना येथे हजर होण्यासाठी पाठविले. तर दुसऱ्या एकाला कटीहारच्या (बिहार) रेल्वेस्टेशनवर नियुक्ती झाल्याचे पत्र दिले.
धनोदश वठला नाही
आरोपींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच नवघरे यांनी त्यांना जाब विचारला आणि पैशाची मागणी केली. तेव्हा त्यांनी दोन धनादेश दिले. हे धनादेश तक्रारदारांनी बँकेत वटण्यासाठी टाकले असता ते अनादरीत झाले.