ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Published: May 12, 2015 01:57 AM2015-05-12T01:57:21+5:302015-05-12T01:57:21+5:30

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड

18 tanker water supply in rural areas | ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

Next

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असून त्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या टंचाईचा हा अहवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला.
नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या या बैठकीला आमदार, खासदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बोरसे आदींसह महापालिकांचे प्रतिनिधी, विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते.
महापालिकांसह ग्रामीण व दुर्गम भागातील टंचाईसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. पाणीसमस्या तत्काळ दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. धरणांच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी बैठकीमध्ये टंचाई कमी झाल्याचा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सांगितले.
धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आधीच कपात सुरू करण्यात आली आहे. पण, या कपातीच्या नावाखाली बहुतांशी ठिकाणी २४ तासांच्या पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. यासाठी महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, जलसंपदा विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.
बैठकीत उल्हासनगरातील २४ तासांची पाणीकपात १२ तासांवर आणण्याकरिता चर्चा झाली. भिवंडी शहरातील पाणीगळती, होणारा टँकरचा पाणीपुरवठा विकासकांसह डाइंग प्रोसेसिंग कारखान्यांना होत असल्याच्या मुद्यावरही या वेळी चर्चा झाली. मीरा-भार्इंदर महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा केल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणार नाही. अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी सहा महिन्यांत वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. तसेच २४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाकडे असून पाच एमएलडीचे काम आधीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 18 tanker water supply in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.