मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटी, राज्यातील अन्य प्रकल्पांसाठीही भरीव तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 09:25 PM2017-08-01T21:25:34+5:302017-08-01T21:27:58+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले.
नवी दिल्ली, दि. 1 - मुंबई-गोवा महामार्गासह राज्यातील अन्य महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिल्लीत परिवहन मंत्रालयाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी महाराष्ट्रातील 25 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा घेत महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी गडकरींनी आदेश दिले. तसेच मुंबई-गोवा महामार्गासाठी 18 हजार कोटींची तरतुदीची घोषणा करण्यात आली. या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे, खासदार धनंजय महाडीक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
नितीन गडकरींसोबत झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेले महत्त्वाचे प्रकल्प पुढीलप्रमाणे
- कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक प्रकल्प.
- २ हजार कोटी रूपये खर्च येईल.
- पहिले ५०० कोटीचे टेंडर काढले जातील.
- १ हजार कोटी केंद्र सरकार आणि १ हजार कोटी महापालिका खर्च करेल.
२५ हजार कोटींच्या कामांचा आढावा घेतला.
- मुंबई-गोवा रस्ता १८ हजार कोटींचा.
- ६० टक्के भू संपादन झाले नाही. स्ट्रक्चरल काम सुरू केले.
- औरंगाबाद - जालना (अंजिठा) रस्ता. कामाला मंजूरी दिली
- सातारा- कागल-कोल्हापूर ६ लेन करायचा आहे.
- मार्ग काढून ३ हजार कोटी देण्याचा निर्णय . टेंडर १ महिन्यात काढू.
- ३ महिन्यात काम सुरू करू.
- जालना चिखली चौपदरीकरणकरण करणार.- ठाणे भिवंडी एनएचएआय करणार
- ठाणे भिवंडी बायपास (नाशिक) ८ लेन करणार.
- १ हजार कोटींचे टेंडर निघेल.
- १ महिन्यात काम सुरू होईल.
- महाराष्ट्र - मध्य प्रदेश राष्ट्रीय महामार्ग रखडला आहे.
- दोन्ही पैकी पैकी एकच राज्य डीपीआर करेल.
- यापूर्वी दोन राज्य डीपीआर बनवत असे.
- दोन राज्यांनी डीपीआरचे काम हाती घेतल्यामुळे उशीर होत असे
- सर्वच राज्याकरिता नियम असेल.
कल्याण-ठाणे जलवाहतुकीचा मार्ग मोकळा
ठाणे आणि त्यापुढील रहिवाशांना किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कल्याण-ठाणे-मुंबई जलवाहतूक सुरू व्हावी, या दृष्टीने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला होता. त्याला मंजुरी मिळावी, यासाठी शिंदे आणि विचारे यांनी दिल्लीत सातत्याने पाठपुरावा केला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात गडकरी यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त जयस्वाल यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन व्यवहार्यता अहवाल आणि प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार केला. त्याचे सादरीकरण सोमवारी गडकरी यांच्यासमोर केले. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात कल्याण-ठाणे-वसई-मीरा भार्इंदर हा जलमार्ग विकसित करण्यात येणार असून त्यासाठी ४५३ कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, काल्हेर, कोलशेत, नागला बंदर, घोडबंदर रोड, मीरा-भार्इंदर, वसई किल्ला या ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. गडकरी यांनी ठाणे महापालिकेला अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे निर्देश देताना प्रकल्पातील खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्यास तयारी दर्शविली.