विठुरायाच्या दर्शनासाठी १८0 बसेसचे नियोजन
By admin | Published: June 16, 2014 10:03 PM2014-06-16T22:03:47+5:302014-06-16T22:12:35+5:30
शेतकरी कष्टकर्यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
अकोला : शेतकरी कष्टकर्यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी १५0 जादा बसेस पंढरीच्या वारीसाठी सोडण्यात आल्या होत्या; मात्र प्रवाशांच्या तुलनेत या बसेस अत्यंत कमी पडल्याने यावर्षी अकोला विभागासाठी १८0 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी विदर्भातील भाविक मोठय़ा संख्येने जातात. पायदळ दिंड्यांची यामध्ये मोठी संख्या आहे. मोठय़ा संस्थानमधून पायदळ दिंड्या आषाढी एकादशीच्या एक महिन्यापूर्वीच रवाना झाल्या असून, आता एकादशीपूर्वी एसटी बसेस व रेल्वेच्या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये रेल्वे आणि एसटी बसेसने जाणार्या भाविकांचीही मोठी संख्या असून, त्या प्रमाणात अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने अकोला विभागासाठी १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अकोला विभागातील सर्वच आगारांचा समावेश असून,आषाढी एकादशीच्या आठ दिवसापूर्वीपासून या विशेष एसटी बसेस आगार क्रमांक दोनमधून सोडण्यात येणार आहे. त्यानंतर पंढरपूरवरून परत येण्यासाठी आषाढी एकादशीनंतर विशेष अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. अकोला विभागातील विविध आगारातून या १८0 एसटी बसेस सोडण्यात येणार असून, यामध्ये वाशिम, मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, आकोट, कारंजा, तेल्हारा, रिसोड, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर आगारांचा समावेश आहे. पंढरपूरला जाणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने १८0 जादा बसेसचे नियोजन केले असून, या बसेस केव्हापासून धावणार तसेच कुठल्या आगाराला किती बसेस देण्यात येणार, याबाबतचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.