पश्चिम विदर्भातील ५०१ प्रकल्पांत १८.५५ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 08:07 PM2019-04-06T20:07:10+5:302019-04-06T20:07:14+5:30
पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
-संदीप मानकर
अमरावती - पश्चिम विदर्भातील आठ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघु अशा एकूण ५०१ प्रकल्पांत सरासरी १८.५५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून, एप्रिल ते जून असे तीन महिने प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याकरिता जलसंपदा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला योग्य नियोजन करावे लागणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने तेथे आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
विभागातील आठ मोठ्या प्रकल्पांत २०.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत २४.२४ टक्के आणि ४६९ लघुप्रकल्पांत १२.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५०१ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२९६.१६ दलघमी आहे, तर आजचा उपयुक्त पाणीसाठा हा ६११.१२ दलघमी शिल्लक आहे. विभागातील अमरावती जिल्ह्यातील ८५ प्रकल्पांत २२.४० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १२० प्रकल्पांत सरासरी २५.५२ टक्के पाणीसाठा आहे, तर अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पांत १७.४९ टक्के, वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पांत ११.२ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील १०४ प्रकल्पांत सर्वात कमी ५.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
आठ मोठ्या प्रकल्पांची पाणीसाठा स्थिती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाºया अप्पर वर्धा प्रकल्पांत २०.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३३.३२ टक्के, अरुणावती प्रकल्पात १९.९३ टक्के, बेंबळा प्रकल्पात २३.८५ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २०.४७ टक्के, वान प्रकल्पात सर्वाधिक ४०.७७ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ९.९७ टक्के, पेनटाकळी प्रकल्पात ०.७३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांत सर्वांत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने पाणीटंचाईची झळ आतापासून जाणवू लागली आहे.