सोलापूर मंडलात १८६८ वीज चोर
By admin | Published: August 30, 2016 09:26 PM2016-08-30T21:26:50+5:302016-08-30T21:26:50+5:30
आर्थिक वर्ष एप्रिल २०१५ ते जुलै २०१६ या कालावधीत महावितरणच्या विशेष पथकाने भारतीय वीज कायद्याच्या कलम १२६, कलम १३५ व १३८ अंतर्गत सोलापूर
Next
>- आप्पासाहेब पाटील/ आॅनलाईन लोकमत
सोलापूर, दि. ३० - आर्थिक वर्ष एप्रिल २०१५ ते जुलै २०१६ या कालावधीत महावितरणच्या विशेष पथकाने भारतीय वीज कायद्याच्या कलम १२६, कलम १३५ व १३८ अंतर्गत सोलापूर मंडलातील १८६८ वीज चोरांवर कारवाई करून ६ कोटी ५६ हजार रूपयांचा दंड केला असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़.
सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महावितरणकडून घरगुती, व्यावसायिक, कृषी, औद्योगिककरिता वीज पुरवठा केला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणे अपेक्षित असते; परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणे किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणे आदी प्रकारातून वीज चोरी करतात.
तसेच काही ग्राहक विजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात येते. एप्रिल २०१५ ते जुलै २०१६ या कालावधीत जिल्ह्यात १८६८ वीज चोरांवर कारवाई करून ६ कोटी ५६ हजार रूपये दंड केला आहे़.
१९८ वीज चोरांवर गुन्हे दाखल
सोलापूर शहर व जिल्ह्यात महावितरणकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत १९८ वीज चोरांवर कारवाई करण्यात आली आहे़ आकडे टाकून विजेचा वापर करणाºया १८६ जणांवर कारवाई करून ६ लाख ८ हजार रूपये वसूल केले आहेत़ शिवाय हूक टाकणे, पट्टी टाकणे, मीटर डायरेक्ट करणे असे कृत्य करणा-या १२ जणांवर गुन्हे दाखल करून ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे़.
५२६ जणांनी भरले २५ लाख ३९ हजार
- वीज चोरांवर कारवाई करताना महावितरणच्या विशेष पथकाने केलेल्या दंडापोटी जिल्ह्यात आतापर्यंत ५२६ वीज ग्राहकांनी २५ लाख ३९ हजार रूपयांचा दंड भरून महावितरणला सहकार्य केले आहे़ कारवाई केलेल्या अनेक वीज ग्राहकांनी अद्यापपर्यंत दंड भरलेला नाही़ त्यामुळे त्यांची वीजजोडणी बंद करण्यात आली असल्याचे महावितरणने सांगितले़
अशी होते वीज चोरी
- महावितरणच्या मुख्य तारेवर आकडा टाकणे, अनधिकृत वीजजोडणी, हूक टाकणे, मीटर डायरेक्ट करणे, मीटरमध्ये पट्टी टाकणे, मीटरमध्ये छेडछाड करून चुकीचे रीडिंग दाखविणे, मीटर बंद पाडणे यासारख्या चुका करून मोठ्या प्रमाणात वीज चोरी करीत असल्याचे महावितरणच्या विशेष पथकाच्या निदर्शनास आले आहे़.
वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. सर्वंकष प्रगतीसाठी वीज अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असल्याने विजेचा वापर सर्वांनीच काळजीपूर्वक केला पाहिजे. वीज चोरी पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील वीज चोरांवर कारवाई सुरू आहे़ त्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत़ शिवाय वीज थकबाकी वसूल करून वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठ्याबरोबर अडचणी सोडविण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे.
-धनंजय औंढेकर
अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल़