१९ विमानं, ४ हेलिकॉप्टरच्या गिरक्यांनी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे
By admin | Published: September 4, 2016 10:32 PM2016-09-04T22:32:20+5:302016-09-04T22:32:20+5:30
विमानाच्या गिरक्यांनी रविवारी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले.
राजकुमार सारोळे
सोलापूर, दि. 4 - विमानाच्या गिरक्यांनी रविवारी सोलापूरकरांचे डोळे आकाशाकडे लागले. सोलापूर विमानतळावर दिवसभरात १९ विमाने व ४ हेलिकॉप्टर उतरली. होटगीरोड विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक झाली.
विमान वाहतुकीची या गर्दीचे निमित्त होते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाचे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय अर्थमंत्री व खासदार पी. चिदंबरम, माजी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शैलजा, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी खासदार विजय दर्डा, मोहन बाबू आदींसह अनेक मान्वरांचे विमान व हेलिकॉप्टरने सोलापुरात आगमन झाले. श्सकाळी साडेआठ वाजता माजी मंत्री पतंगराव कदम यांचे विमान आले. त्यानंतर साडेदहा वाजता मुख्यमंत्री फडवणीस व इतर मान्यवरांची विमाने आली. विमानतळावर पार्किंगसाठी जागा नसल्याने ही विमाने तातडीने लातूर, हैदराबाद, पुणे, मुंबईकडे रवाना झाली. शनिवारी मुंबईत खराब हवामानामुळे एक हेलिकॉप्टर सोलापूर विमानतळावरच उतरविण्यात आले होते. हे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी रवाना झाले.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आगमनासाठी दुपारी अडीच वाजता विमानतळ राखीव ठेवण्यात आले. पावणेतीन वाजता बीदरहून राष्ट्रपतींच्या तीन हेलीकॉप्टरचा ताफा विमानतळावर आला. कार्यक्रम आटोपून राष्ट्रपतींचा ताफा बीदरकडे रवाना होईपर्यंत विमानतळावर कडक सुरक्षा होती. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर बीदरकडे झेपावल्यावर पुन्हा विमानांचा राबता सुरू झाला. शेवटचे विमान सायंकाळी साडेसहा वाजता टेकआॅफ झाले. दिवसाभरात राष्ट्रपतींच्या ताफ्यातील तीन हेलिकॉप्टर, एक खाजगी हेलिकॉप्टर आणि विमानांचे टेकआॅफ व लँडिंग ३८ झाले अशी माहिती विमानतळाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिली. सोलापूर विमानतळावरची आजची वाहतूक ऐतिहासिक ठरली. विमानतळाशेजारी राहणाऱ्या नागरिकांना पुणे—मुंबई विमानतळाच्या परिसराच्या वातावरणाचा अनुभव आला.
विमानतळ गजबजले
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अनेक व्हीव्हीआयपी विमानाने आले. त्यामुळे मान्यवरांच्या स्वागतासाठी विमानतळावर सर्वच पक्षीय कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. पाहुण्यांना सोडून विमाने पुन्हा आकाशात झेपावत होती. शहरातील मुलांना मात्र विमानांची ही गंमत वाटत होती.