कोकणच्या घाटात १९ बोगदे

By admin | Published: February 27, 2015 09:48 PM2015-02-27T21:48:42+5:302015-02-27T23:23:03+5:30

सह्याद्रीच्या पर्वतरांगात ‘झुक-झुक’ : कऱ्हाड- चिपळूण रेल्वे मार्ग तब्बल ११२ किलोमीटरचा; देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बोगदा कुंभार्लीत

19 bogies in Konkan Ghat | कोकणच्या घाटात १९ बोगदे

कोकणच्या घाटात १९ बोगदे

Next

कऱ्हाड : कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यामुळे कोकण रेल्वे उर्वरित महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रयत्नांना आता खऱ्या अर्थाने मूर्तरूप येणार आहे. या रेल्वेला मंजुरी मिळाली असली तरी ती कोणत्या मार्गाने धावणार, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुमारे दोन वर्षांपूर्वी झालेल्या सर्वेक्षणावरून ही रेल्वे पश्चिम घाटातील डोंगराच्या पायथ्याने धावणार असल्याची चिन्हे आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी लहान-मोठे १९ बोगदेही तयार करावे लागणार असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
कोकण रेल्वे कऱ्हाडमार्गे उर्वरित महाराष्ट्राला जोडण्यासाठी गत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदी असताना त्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. कऱ्हाडला रेल्वेचे जंक्शन करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मात्र, दरवर्षीच्या केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाबाबत निराशा होत होती. मागणी करूनही या मार्गाला मंजुरी मिळत नव्हती. सुमारे दोन वर्षांपूर्वी या मार्गासाठीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही. प्रक्रिया धिम्यागतीने सुरू असताना कोणताच ठोस निर्णय होत नव्हता. अखेर यावर्षीच्या अर्थसंकल्पात कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळाला. सुमारे ११२ किलोमीटरच्या या मार्गासाठी बाराशे कोटींची तरतूदही करण्यात आली. त्यामुळे काही अवधीतच या रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. कऱ्हाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोकण भाग उर्वरित महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे; पण त्याचबरोबर याचा सर्वात जास्त फायदा कऱ्हाडला होणार आहे. या मार्गामुळे कऱ्हाडचे औद्योगिक क्षेत्र झपाट्याने विस्तारण्यास मदत होणार आहे. तसेच भूकंप संशोधन केंद्रासह इतर सोयी-सुविधांसाठीही हा मार्ग पोषक ठरणार आहे. घाटमाथ्यावर प्रस्तावित असलेल्या औद्योगिक वसाहतीलाही त्यामुळे चालना मिळण्याची चिन्हे आहेत.
सध्या कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरण व राज्यमार्गांच्या चौपदरीकरणाचे कामही गतीने सुरु आहे. विस्तारत असलेले विमानतळ, चौपदरी होत असलेले राज्यमार्ग आणि कऱ्हाड-चिपळूण हा
नवा रेल्वे मार्ग हे सर्व कऱ्हाडचे महत्त्व वाढविण्यास हातभार लावणार आहेत. (प्रतिनिधी)

९० गावे, १० रेल्वे स्थानके
कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग ९० गावांमधून जाणार असून, रेल्वेमार्गावर १० रेल्वे स्थानके होणार आहेत. कऱ्हाडनंतर साकुर्डी, मल्हारपेठ, नाडे, पाटण, कोयनारोड, मुंढे, खेर्डी, चिपळूण आदी रेल्वे स्थानके होणार आहेत.
सप्टेंबर २०१३ पासून सर्वेक्षण
कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गामुळे कोल्हापूरसह पुणेही रत्नागिरीच्या जवळ येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मार्गासाठी विशेष प्रयत्न केले असून, केंद्रीय रेल्वे बोर्डानेही अन्य पर्यायी मार्गापेक्षा चिपळूण-कऱ्हाड हाच रेल्वे मार्ग सोयीचा असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे सप्टेंबर २०१३ मध्ये चिपळूण येथून या मार्गाच्या सर्वेक्षणाला युद्धपातळीवर सुरुवात झाली होती.

दळणवळणास येणार गती
मसूर : कराड-ढेबेवाडी या नवीन रेल्वे महामार्गामुळे व्यापाराची वृद्धी होईल, असे जाणकारांनी सांगितले. तसेच या मार्गामुळे कोकणातील दळणवळण सोपे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कोकणातील रानमेवा चाखण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना एका दिवसात तेथे जाऊन माघारी येण्यास मदत होणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या नवीन रेल्वेमार्गामुळे कराड तसेच सातारा जिल्ह्याच्या पूर्वेच्या गावातील नोकरी धंद्यानिमित्त कोकणात असणाऱ्या कामगारांना याचा चांगला फायदा होणार आहे. तसेच यानिमित्ताने दोन्ही कडील उत्पादनांची आयात-निर्यात वाढण्यास ही मोठी मदत होणार असल्याने व्यापार वाढीस मदत होईल.
पर्यटनानिमित्त कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यासही मदत होणार आहे. शेतकरी, लहान उद्योजकांनाही कराड-ढेबेवाडी या नवीन रेल्वे महामार्गामुळे मोठा फायदा होणार आहे. दळणवळ, व्यापार, व्यवसाय वाढीमुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहे.

अपेक्षेपेक्षा जास्त तरतूद !
नियोजित कऱ्हाड-चिपळूण हा मार्ग हा सुमारे १०४ किलोमीटर लांबीचा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच २०१३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या मार्गासाठी सुमारे, ९२८.१० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, सध्या या मार्गाला मंजुरी देतानाच १२०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
सात किलोमीटरचा बोगदा
मार्गावर लहान-मोठे एकूण १९ बोगदे असून, यापैकी कुंभार्ली घाटातील बोगदा सात किलोमीटर लांबीचा असणार आहे. कोरे मार्गावर करबुडे हा बोगदा साडेसहा किलोमीटर लांबीचा असून, याच्या तुलनेत कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्र्ली घाटातील हा बोगदा मोठा असणार आहे.
कऱ्हाड आणि चिपळूण जंक्शन
रेल्वेमार्ग प्रत्यक्षात साकार झाल्यानंतर चिपळूणसह कऱ्हाड रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. हा मार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक गाडीला येथे हमखास थांबा मिळेल. पर्यायाने कोकणातील एक मध्यवर्ती केंद्र म्हणून चिपळूणचा तर दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून कऱ्हाडचा झपाट्याने विकास होईल.
कमी खर्च आणि जास्त फायदा
रत्नागिरी जिल्हा आणि पर्यायाने कोकण प्रांत रेल्वेमार्गाने कोल्हापूरशी जोडण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहे. चिपळूण-कऱ्हाड, रत्नागिरी-कोल्हापूर, राजापूर-कोल्हापूर, सावंतवाडी-कोल्हापूर अशा विविध मार्गांचा या मागण्यांमध्ये समावेश होता. मात्र, कमी खर्च आणि जास्त फायदा असल्याने अखेर कऱ्हाड-चिपळूण मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: 19 bogies in Konkan Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.