राज्यात १९ टक्क्यांनी कोरोना रुग्ण घटले, मुंबईत वाढ; मृत्युदर १.१६ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 07:49 AM2021-10-17T07:49:53+5:302021-10-17T07:51:31+5:30
मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली.
मुंबई : राज्यासह मुंबईच्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता दोन्हीकडे वेगवेगळे चित्र दिसून येते. मागील दोन आठवड्यांत मुंबईत नवीन रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर राज्यात रुग्णांमध्ये १९ टक्क्यांनी घट झाली.
राज्यातील रुग्णसंख्या व मृत्युदरात घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये राज्याचा मृत्युदर १.६५ टक्के होता. तो आता कमी होऊन १ ते १२ ऑक्टोबरदरम्यान १.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ राज्यात फक्त रुग्णसंख्याच कमी झालेली नाही, तर मृत्युदरातही घट झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून, काही जिल्हे सोडल्यास काळजीचे वातावरण नसल्याचे राज्य कोविड टास्क फोर्सने स्पष्ट केले. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले. मृत्यूचे प्रमाणही जास्त होते. मात्र, गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या सुरुवातीला मृत्युदरामध्ये घट नोंदविण्यात आली आहे. फेब्रुवारीआधी दररोज ४,६९० रुग्ण सापडत होते. तेव्हा १,४६४ मृत्यू नोंदविण्यात आले. मात्र, आता सरासरी रुग्ण घटले असून, मृत्यूही तीनअंकी नोंदविले जात आहेत.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. सणाचे दिवस सोडले, तर कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्याखेरीज अन्य जिल्ह्यांतील सक्रिय रुग्णांचा आलेख घसरता आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांत सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचाराधीन रुग्ण १०० च्या खाली आहेत. नंदुरबार आणि भंडाऱ्यात केवळ दोन रुग्ण आहेत. राज्यात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर हा २.०३ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर असून, याचे प्रमाण ६.९ टक्के आहे. त्याखालोखाल, पुणे, नाशिक आणि पालघरचे स्थान आहे. डॉ. जोशी यांनी सांगितले की, पुढील तीन महिन्यांसाठी मुंबईतील कोरोना संसर्गाच्या स्थितीवर वैद्यकीय तज्ज्ञांचे बारकाईने लक्ष राहील, असे ते म्हणाले.
राज्यात दैनंदिन रुग्णांत मोठी घट
राज्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात झाली, त्यानंतर संसर्गाच्या दोन लाटांचा तडाखा सहन केल्यानंतर आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत आहे. परिणामी, तीव्र संसर्गानंतर शनिवारी पहिल्यांदाच राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या १,५५३, तर मृत्यू २६ असल्याची नोंद झाली. सध्या २९,६२७ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात दिवसभरात १,६८२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ६४,१६,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या ८,०८९ आहे. त्याखालोखाल मुंबई ६०५६, ठाणे ३९४३, अहमदनगर ३७६९, रायगड १११३, सातारामध्ये ११३५ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात ९ कोटी जणांना कोरोना लस
राज्यात शुक्रवारी ४१,०५८ जणांना कोरोना लस देण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात एकूण ९,०७,८७,५१५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. राज्यात १८ ते ४४ वयोगटांतील ३,३६,३८,२६ जणांना पहिला डोस, तर ९७,०८,५९५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.