राज्यात विसर्जनावेळी १९ जणांचा बुडून मृत्यू

By Admin | Published: September 17, 2016 02:46 AM2016-09-17T02:46:58+5:302016-09-17T02:46:58+5:30

गणरायाला निरोप देताना राज्यात विविध दुर्घटनेत १९ जणांचा बुडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला.

19 people die drowning during the state immersion | राज्यात विसर्जनावेळी १९ जणांचा बुडून मृत्यू

राज्यात विसर्जनावेळी १९ जणांचा बुडून मृत्यू

googlenewsNext

मुंबई : गणरायाला निरोप देताना राज्यात विविध दुर्घटनेत १९ जणांचा बुडून मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल खान्देशात सहा, नगर आणि पुणे जिल्ह्यात प्रत्येकी दोन आणि मुंबईत एकजण बुडाला.
सिन्नर तालुक्यातील मुसळगावमधील साठवण बंधाऱ्यात विसर्जनावेळी एक तरुण बुडत असताना पाहून लष्कराचा जवान संदीप सिरसाट याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने रामेश्वर शिवाजी सिरसाट (३१), संदीप अण्णा सिरसाट (२५) यांचा बुडून मृत्यू झाला़ वालदेवी फाट्याजवळील खाणीत नीलेश साईनाथ पाटील ( २५) बुडाला. मालेगाव तालुक्यात सुमित कांतीलाल पवार (१४) व सचिन लहू देवरे (१६) पाण्यात बुडाले.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूषण हरी कसबे (१७), अमोल साहेबराव पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नाशिकमधील गंगापूररोडवरील जलाशयात रोशन रतन साळवे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़
अहमदनगर जिल्ह्यात प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत परमेश्वर विठ्ठल शेंगुळे (२६, रा. वाळुंज, जि. औरंगाबाद) हे शिक्षक पोहता येत नसल्याने बुडाले. संगमनेर तालुक्यातील माहुली येथे शाहरुख राजमहम्मद सय्यद (२१) हा तलावात बुडून मृत्यू पावला़ पुण्यात पिंपळे सौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाटावर शंकर हुसेन लोखंडे (४८) नदीपात्रात बुडाले. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.

मुंबईत तिघांचा मृत्यू
मुंबईत कांदिवली येथे गुरुवारी रात्री विसर्जन मिरवणुकीत ताशा वाजवणारा अजय खारवा (१८) हा तरुण चक्कर येऊन पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर विसर्जन मिरवणुकीत चक्कर येऊन पडलेल्या प्रवीण पवार(२६) याला गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलावात गणेशविसर्जनावेळी एक तरुण बुडाला. भांडूप खिंडीपाडा येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत जनरेटर सेटला आग लागली. त्यात नऊ मुले जखमी झाली.

विदर्भात दोघांचा मृत्यू
ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा खेड येथील राहुल सुखदेव आत्राम (२५) हा युवक शेळ््या पाण्याबाहेर काढताना गोसीखुर्द नहराच्या पाण्यात बुडाला. तर पोंभुर्णा येथे तलावात पोहण्यासाठी गेलेला महेश गोपीनाथ गौरकार (१६) हा विद्यार्थी पाण्यात बुडाला.
पुण्यात दोन जण बुडाले
पुण्यात गणेश विसर्जनावेळी धायरी पुलाखालील कालव्यामध्ये बुडून पवन वसंत गायकवाड (वय २०, रा. धायरी) याचा मृत्यू झाला. खडकी येथील शस्त्र निर्माण फॅक्टरीमागे विसर्जनाकरिता गेलेला एक युवक बुडाला. त्याचेही अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू असून त्याचे नाव समजू शकले नाही.

खान्देशात ६ जणांचा बुडून मृत्यू
खान्देशात सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात धुळे व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे कांग नदीत दोन युवक तर भुसावळ येथे तापी नदीत एक ४५ वर्षीय इसम बुडाला. धुळे जिल्ह्यात निमडाळे व रतनपुरा येथील युवक विसर्जनादरम्यान तालावात बुडाले तर सिताणे येथील म्हसोबा तलावात आणखी एक जण बुडून मरण पावला. निमडाळे येथील तलावाच्या पाण्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला़

नाशिक : जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या आवाहनाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत अनंत चतुर्दशीला दोन लाख ३९ हजार २२८ गणेशमूर्तींचे दान केले. महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेल्या केंद्रांवर दिवसभरात १६९ टन निर्माल्य उचलले.
पुणे महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेसह स्वयंसेवी संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या अमोनियम बायकार्बोनेट पावडरलाही नागरिकांनी प्रतिसाद देत इको फ्रेंडली गणेश विसर्जनाचा प्रयोगही करून पाहिला. मूर्ती संकलनासाठी काही केंद्रांवर स्वत: महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासहआयुक्त अभिषेक कृष्ण यांनी उपस्थित होते.

Web Title: 19 people die drowning during the state immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.