पुनर्वसन केंद्रातून १९ तरुणी पसार
By Admin | Published: October 12, 2015 05:23 AM2015-10-12T05:23:27+5:302015-10-12T05:23:27+5:30
पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या देहव्यापार करणाऱ्या १९ तरुणी येथील टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून २ बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या.
नरेश रहिले, गोंदिया
पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या देहव्यापार करणाऱ्या १९ तरुणी येथील टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून २ बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
५ आॅक्टोबर २०१५ रोजी १९ तरुणी व महिलांसह त्यांच्या २ बालकांना येथील टीबीटोली परिसरातील राष्ट्रीय उज्ज्वला गृहात ठेवण्यात आले होते. न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थाद्वारे संचालित ही संस्था गतिमंद, अनाथ, विधवा, परित्यक्ता व अनैतिक व्यापार करणाऱ्या महिलांच्या कल्याणासाठी काम करते. या ठिकाणी त्यांना राहण्याच्या सोयीबरोबर प्रशिक्षणही दिले जाते.
शनिवारी सायंकाळी या तरुणींनी पळण्याचा कट रचला व रात्री ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान या सुधारगृहातील गार्ड योगेश गोरखडे (३०) हा नेहमीप्रमाणे सर्व खोल्यांचे दार बंद करीत असताना त्यातील एका तरुणीने त्याच्याकडे बटाटे मागितले. योगेश बटाटे काढण्यासाठी गेला असता, त्याच्या मागे असलेल्या तिघींनी त्याच्यावर पीठ टाकून आपल्या ओढणीने बांधून ठेवले. त्याला मारहाणही केली आणि त्याच्या जवळील किल्ल्या हिसकावून पसार झाल्या.
यासंदर्भात रामनगर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.