काेराेना काळात हाॅटेल, रेस्टाॅरंटला १९० लाख कोटींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 05:21 AM2020-11-15T05:21:44+5:302020-11-15T05:25:01+5:30
CoronaVirus News: तज्ज्ञांचे मत : काेराेनाचा फटका, सावरण्यासाठी लागणार माेठा अवधी
n सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचे सुमारे १९० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हॉटेल क्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास कमीतकमी दीड वर्षाचा तर रेस्टॉरंट क्षेत्र उभे राहण्यास कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कोरोनासह लॉकडाऊनमुळे ३० ते ४० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट कायमस्वरूपी बंद झाली आहेत; किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.त्यांना रोजगार देणारे क्षेत्रच रसातळाला गेले आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित कामगार काम करतात. ही संख्या सुमारे ७० टक्के आहे. स्थानिक कामगार कमी संख्येने या क्षेत्रात आहेत, अशी माहिती हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दिली.
लॉकडाऊन शिथिल होत असले तरी अद्याप स्थलांतरित कामगार परत आलेले नाहीत. कारण रेल्वे अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास बराच अवधी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मालमत्ता करात १ वर्षाची सवलत द्यावी, मार्च ते सप्टेंबर २०२० पर्यंत हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी व्याज माफ करावे, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय
विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर कदाचित काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवावे लागले हे खरे, मात्र महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत.
- गुरुबक्ष सिंग कोहली, प्रवक्ता, हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया