वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:13 AM2024-09-11T10:13:26+5:302024-09-11T10:13:34+5:30

पाणी व सिंचनाअभावी परिसरातील स्थानिकांचा विरोध, या अहवालानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (ठाणे) यांनी ३ जुलै रोजी प्रस्ताव सादर केला.

19.90 TMC water from Vaitarna River will now be diverted to Marathwada | वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

वसंत भोईर 

वाडा : राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.

वाडा तालुक्यातून तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगाई अशा पाच नद्या वाहतात. या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच त्या कोरड्या पडतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येत नाहीत.  यातील वैतरणा व पिंजाळ या नद्यांवर बंधारे बांधण्यात आल्याने बंधारे बांधलेल्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध होते. उर्वरित ठिकाणी मात्र नदी कोरडी पडते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

पाणी वळवणे शक्य?

जलसंपदा विभागाने काढलेल्या परिपत्रकात, पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यांतून (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबाबत प्राथमिक अभ्यास करण्यासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार समिती स्थापन करण्यात आली होती.  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (छत्रपती संभाजीनगर) हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या अहवालानुसार पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील उल्हास खोऱ्यातून ३४.८०, तर वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी वळविणे शक्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.

अंदाजपत्रकासही मंजुरी

या अहवालानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (ठाणे) यांनी ३ जुलै रोजी प्रस्ताव सादर केला. त्याअनुषंगाने या योजनेचे सर्वेक्षण, अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जलसंपदा विभागाच्या प्रधान उपसचिव जया पोतदार यांच्या सहीने काढण्यात आला असून या निर्णयामुळे वैतरणा खोऱ्यातील गावांत मात्र खळबळ माजली आहे.

Web Title: 19.90 TMC water from Vaitarna River will now be diverted to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.