१९९३ बॉम्बस्फोट खटला; कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:35 AM2017-09-08T04:35:01+5:302017-09-08T04:35:17+5:30
१९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील गुरुवार हा निकालाचा दिवस असल्याने नेमका निकाल काय लागतो, याविषयी सेशन कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता असे वातावरण दिसत होते.
मुंबई : १९९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील गुरुवार हा निकालाचा दिवस असल्याने नेमका निकाल काय लागतो, याविषयी सेशन कोर्टाबाहेर तणाव आणि उत्सुकता असे वातावरण दिसत होते. कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती, तशीच सर्वसामान्य लोकांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या खटल्यातील आरोपी अबू सालेमसह अन्य आरोपींना नेमकी किती शिक्षा सुनावली जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले होते. संपूर्ण न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मुख्य प्रवेशद्वारापासून ते गेट क्रमांक ५पर्यंत पोलीस तैनात होते. जसजशी आरोपींना शिक्षा सुनावण्यास सुरुवात झाली, तशी बघ्यांचीही उत्सुकता वाढत गेली. सरकारी वकील उज्ज्वल निकम आरोपींच्या शिक्षेबाबत कधी माहिती देतात, याकडेही सर्वांचे लक्ष होते.
देशात दहशतवादाला थारा नाही
ज्या बॉम्बस्फोटांतील आरोपींना शिक्षा मिळाली आहे त्यांनी मोठे षड्यंत्र रचले होते. देशाच्या विरोधात मोठा गुन्हा केला होता. यापैकी दोघांना फाशी झालेली आहे. अन्य आरोपींना जन्मठेप झालेली आहे. पीडितांना आणि मुंबईला न्याय मिळाला आहे. जे देशाच्या विरोधात आहेत; त्यांना चांगलाच संदेश या शिक्षेमुळे जाईल. देशात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला थारा दिला जाणार नाही.
- शाहनवाज हुसैन, ज्येष्ठ भाजपा नेते
उशिरा का होईना न्याय मिळाला
बॉम्बस्फोटासारखे भयंकर कृत्य करणाºया दहशतवाद्यांना शिक्षा मिळायलाच हवी
होती. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. निकालासाठी खूप उशीर झाला; पण १९९३ बॉम्बस्फोटांतील पीडितांना अखेर न्याय मिळाला.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
निकालाबाबत समाधानी
या खटल्यात दोन आरोपींना फाशीची शिक्षा मिळाल्याचे समाधान आहे. अजून एक फाशी मी मागितली होती, न्यायालयाने त्या आरोपीस जन्मठेप सुनावली. जन्मठेप देताना न्यायालयाने काय म्हटले आहे, हे निकालपत्र वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. अबू सालेमलाही जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. अन्य एका आरोपीला जन्मठेप मागितल्यानंतर न्यायालयाने त्याला १० वर्षांची शिक्षा सुनावली.
- दीपक साळवी, सीबीआयचे वकील