१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपीला अटक
By Admin | Published: July 9, 2017 03:06 AM2017-07-09T03:06:27+5:302017-07-09T03:06:27+5:30
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या
लखनौ : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादीविरोधी पथकाने एकत्रित केलेल्या कारवाईमध्ये बिजनौरमधून कादिर अहमद नावाच्या इसमाला ताब्यात घेतले आहे.
बिजनौरमधील नजीजाबाद येथून कादिर अहमदला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कादिर अहमदला टाडा न्यायालयाने आधीच दोषी ठरविले आहे. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेसाठी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात कादिर अहमदचा सहभाग होता, असा आरोप आहे.
मुंबईतील बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनद्वारे जामनगर येथे जी शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पुरविण्यात आली होती, त्यात कादिर अहमद याचाही सहभाग होता, असे उघडकीस आले आहे. दहशतवादीविरोधी पथकाचे प्रमुख अरुण असीम यांनी सांगितले की, कादिर अहमदची आम्ही चौकशी करीत आहोत. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येईल आणि नंतर गुजरातला पाठवण्यात येईल.