1993 खटल्याचा दुसरा टप्पा, आणखी दोघांना फाशी; अबू सालेमला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 04:54 AM2017-09-08T04:54:48+5:302017-09-08T04:55:21+5:30
मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसºया टप्प्याचा निकाल गुरुवारी तब्बल २४ वर्षांनी लागला. आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.
मुंबई : मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील दुसºया टप्प्याचा निकाल गुरुवारी तब्बल २४ वर्षांनी लागला. आरोपी फिरोज खान व ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या या दोघांना विशेष टाडा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर पोर्तुगालमधून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेम व करीमुल्ला खान या दोघांना जन्मठेपेची तर रियाज अहमद सिद्दिकीला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
अबू सालेमसह, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, फिरोज रशीद खान, करीमुल्ला खान यांना बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणी टाडा तसेच भारतीय दंडसंहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शस्त्रास्त्रे कायद्यांतर्गत न्यायाधीश जी.ए. सानप यांनी शिक्षा ठोठावली. तर रियाझ सिद्दिकीला टाडाअंतर्गत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कय्युमवरील आरोप सरकारी वकील सिद्ध करू शकले नाहीत. त्याची एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.
सर्व आरोपींना मिळून २६ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या स्फोटांत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमींना नुकसान भरपाई म्हणून ही दंडाची रक्कम देण्यात येणार आहे.
मुख्य आरोपी, त्यांची स्फोटातील भूमिका-
ताहीर मर्चंट उर्फ ताहीर टकल्या : दाऊद आणि टायगर मेमनचा खास समजल्या जाणाºया ताहीरने बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याचा बदला घेण्याचे दाऊद व मेमनच्या मनावर बिंबवले. बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत घेण्यात आलेल्या बैठकीत ताहीर उपस्थित होता. भारतात बेकायदा शस्त्रास्त्रांचा कारखाना सुरू करण्यासाठी त्याने पैशांची जमवाजमव केली होती.
फिरोज अब्दुल रशीद खान : मुस्तफा डोसा व त्याचा भाऊ मोहम्मद डोसाचा अतिशय जवळचा. आरडीएक्स, शस्त्रे व स्फोटके दिघी व शेखाडी बंदरावर उतरवण्यापूर्वी मुस्तफाने फिरोजला दुबईहून भारतात पाठवून तेथील कस्टम व पोलीस अधिकाºयांना सामान उतरवण्याची वार व वेळ कळवली. अधिकाºयांना त्यासाठी लाचही दिली. दुबईत झालेल्या बैठकीतही उपस्थित होता.
करीमुल्ला शेख : करीमुल्ला शेखने त्याच्या मित्राला शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाकिस्तानमध्ये पाठविले. त्यानंतर त्याला मुंबईत शस्त्रे आणि आरडीएक्स आणण्यासाठी मदत केली. मुख्य सूत्रधार व फरारी आरोपी टायगर मेमनबरोबर खानने काम केले आहे.
मुस्तफा डोसा : बॉम्बस्फोटांसाठी चार पथके होती. त्यातील एकाचा मुस्तफा डोसा प्रमुख होता. शस्त्रे, आरडीएक्स, एके-५६, हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स इत्यादींचे स्मगलिंग केले. डोसाने टायगर मेमन व छोटा शकीलच्या मदतीने पाकिस्तान व भारतात तरुणांना शस्त्र चालविण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. पनवेल व दुबईत झालेल्या बैठकांना तो उपस्थित होता.
अबू सालेम :
जानेवारी १९९३मध्ये अबू सालेम एका फरार आरोपीसह गुजरातमध्ये भरूचला गेला. तेथून त्याने शस्त्रे, १०० हँड ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या गोळ्या घेतल्या. मारुती व्हॅनमधून हे सर्व सामान मुंबईत आणण्यात आले. त्यातील काही शस्त्रे आणि स्फोटके त्याने अभिनेता संजय दत्तच्या घरी ठेवली व दोन दिवसांनी परत घेतली.
रियाझ सिद्दिकी भरूचवरून मुंबईत सर्व शस्त्रे, स्फोटके पाठवण्यासाठी सालेमला पांढºया मारुती व्हॅनची व्यवस्था करून दिली.