राऊतांनी साडे तीन लोकांच्या कोठडीचा विषय काढला; भाजपचे दोन बडे नेते दिल्लीला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 06:49 PM2022-02-15T18:49:12+5:302022-02-15T18:57:20+5:30
भाजपचे राज्यातील दोन मोठे नेते दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात दिल्ली वारीची चर्चा
मुंबई: सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. आम्ही ऐकत नाही म्हणून कुटुंबीयांना, नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. मात्र आम्ही झुकणार नाही, गुडघे टेकणार नाही. तुम्हाला जे काय बघायचं आहे ते बघून घ्या, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट आव्हान दिलं.
भाजपचे साडे तीन कोठडीत जातील असा गर्भीत इशारा कालच राऊत यांनी दिला. त्यानंतर ते साडे तीन लोक कोण अशी चर्चा सुरू झाली. ठाकरे सरकारवर सातत्यानं निशाणा साधणाऱ्या भाजप नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीला रवाना झाले. राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना आपण प्रवासात असू. दिल्लीला गेल्यावर त्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ, असं पाटील यांनी सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना पुण्यात म्हटलं होतं.
भाजप नेते किरीट सोमय्यांवरसंजय राऊत यांनी आज घणाघाती हल्ला चढवला. सोमय्यांचा उल्लेख राऊतांनी दलाल असा केला. अलिबागमध्ये ठाकरे कुटुंबाचे १९ बंगले असल्याचा आरोप सोमय्या वारंवार करतात. त्यांनी ते बंगले दाखवावेत. त्यांनी बंगले दाखवले, तर मी राजकारण सोडेन आणि त्यांना दाखवता आले नाहीत, तर मी त्या दलालाला चपलेनं मारेन, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्या दिल्लीला गेल्याचं समजतं. राऊत यांनी सोमय्यांचा मुलगा नील याच्यावरही गंभीर आरोप केले. नील सध्या नॉट रिचेबल आहेत. सोमय्या यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. चंद्रकांत पाटील आणि किरीट सोमय्या दिल्लीला रवाना झाल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.