राज्यात ३३ कोटी १ लाख ३१ हजार ५३२ वृक्षलागवड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:16 AM2019-09-27T03:16:10+5:302019-09-27T03:16:18+5:30
वनविभागाची ५० कोटी वृक्षलागवड मोहीम फत्ते
चंद्रपूर : राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या वर्षीच्या ३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाची पूर्तता झाली असून २५ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारपर्यंत ३३ कोटी एक लाख ३१ हजार ५३२ एवढी वृक्षलागवड राज्यात झाली आहे.
हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने राज्यात तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवड करण्याचा निर्धार जाहीर केला होता. सन २०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. वृक्षारोपणाच्या या मोहिमेला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. राज्यात दोन कोटी ८३ लक्ष इतकी वृक्षलागवड करण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. या वेळीसुद्धा पाच कोटी ४३ लक्ष झाडे राज्यात लावण्यात आली. सन २०१८ मध्ये १ जुलै ते ३० जुलैपर्यंत १३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या संकल्पाच्या पूर्ततेसाठीसुद्धा जनतेचा लक्षणीय सहभाग लाभला व राज्यात १५ कोटी ८८ लक्ष वृक्षलागवड करण्यात आली. या विक्रमी वृक्षलागवडीची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’ने घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘मन की बात’ या कार्यक्रमात या मोहिमेचे कौतुक केले.
या वर्षी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. हा संकल्पसुद्धा ३० सप्टेंबरपूर्वीच पूर्ण झाला असून बुधवारी दुपारपर्यंत राज्यात ३३ कोटी १ लक्ष ३१ हजार ५३२ इतक्या वृक्षलागवडीची नोंद झाली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचा निर्धार पूर्ण केला आहे.
हे लोकसहभागाचे यश - सुधीर मुनगंटीवार
३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेच्या या यशाचे संपूर्ण श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. वृक्षलागवडीच्या उद्दिष्टपूर्तीचे हे यश लोकसहभागाचे आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वनविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले आहेत.