जीपमधून २ कोटी ८४ लाख जप्त
By admin | Published: March 4, 2016 03:30 AM2016-03-04T03:30:40+5:302016-03-04T03:30:40+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर एका जीपमधून २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर एका जीपमधून २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम जप्त केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपा पोलीस चौकीजवळ पोलिसांनी
ही जीप अडवली. वरवर तपासणी केली असता जीपमध्ये काहीच सापडले नाही. मात्र, जीपमध्ये सीटखाली बनविलेले लोखंडी लॉकर उघडले असता त्यात २ कोटी ८४ लाख ५० हजारांची रक्कम सापडली. पोलिसांनी जीपसह रोख रक्कम तसेच जीपमधील लोकेश पटेल व आतिष पटेल यांना ताब्यात घेतले आहे.
ही जीप रक्कम घेऊन इंदूरहून मुंबईला जात होती. महामार्गावरील वडपा चौकीजवळ पकडली. या जीपमधील सीटखाली पैसे ठेवण्यासाठी लोखंडी लॉकर बनविले होते. त्या लॉकरच्या चाव्या लॉकरमध्ये रक्कम भरणारा व रक्कम काढणाऱ्यांकडे असतात. त्यामुळे पोलिसांनी चावी बनविणाऱ्याकडून लॉकर उघडले. तेव्हा त्यात ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले. ते मोजले असता २ कोटी ८४ लाख ५० हजार होते.
ही जीप जळगाव पासिंगची असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लोकेश व आतिष यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही. ही बाब संशयास्पद आढळल्याचो पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)