२ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 10:01 AM2024-04-02T10:01:10+5:302024-04-02T10:06:43+5:30
Lok Sabha Elections 2024 : काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे.
अमरावती : देशात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपला प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. यातच अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला महायुतीत असलेले बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे. बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. त्यावरून बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यांवर सडकून टीका केली आहे.
प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली, असे बच्चू कडू म्हणाले. २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची, असा टोला राणा दाम्पत्याला लगावत १७ रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच, १७ रुपयांची साडी मत परिवर्तन करू शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.
दरम्यान, दरवर्षी राणा दाम्पत्य मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राणा दाम्पत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र या साड्या पाहून तेथील आदिवासी महिला चांगल्याच संतापल्याचे दिसून आले. मेळघाटमध्ये वाटलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप महिलांनी केला होता. तसेच, या साड्या वाटपावरून मेळघाटामध्ये चांगलंच वातावरण तापले होते. त्यावरून आता बच्चू कडूंनी त्यांचा समाचार घेतला आहे.
नवनीत राणांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांना उमेदवारी
अमरावती लोकसभेसाठी नववीत राणांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी सुरुवातीपासूनच केली होती. पण भाजपने नववीत राणांना संधी दिली. त्यामुळे महायुतीत असलेले बच्चू कडू नाराज झाले. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा वाद जुनाच असून एकमेकांच्यात विस्तवही जात नसल्याची परिस्थिती आहे. त्याचमुळे बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांची उमेदवारी जाहीर केली. दिनेश बूब हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते. त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले आहे. तसेच, या जागेवर शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे देखील इच्छुक होते. पण, ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अडसूळ देखील नाराज आहेत.