भाजपाचा उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का; २ माजी आमदारांचा BJP मध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 08:03 AM2022-09-22T08:03:18+5:302022-09-22T08:03:48+5:30
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून आता शिंदे गटालाही भाजपाने धक्का देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात खरी शिवसेना कुणाची हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत शिंदे-ठाकरे असे २ गट पडले आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपानं पाठिंबा देत शिंदेंना थेट मुख्यमंत्री बनवले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली असून आता शिंदे गटालाही भाजपाने धक्का देण्यास सुरुवात केली आहे. पालघरमध्ये शिवसेनेच्या २ माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. विशेष म्हणजे प्रवेश केलेले माजी आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशानं अनेक चर्चांना उधाण आले आहे.
पालघरचे शिवसेना माजी आमदार अमित घोडा आणि विलास तरे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. बुधवारी या दोघांनी फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. या दोन्ही आमदारांनी पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. विलास तरे हे २ वेळा आमदार होते. २००९ आणि २०१४ या काळात तरे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेत निवडून आले होते. २०१९ मध्ये तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे तरेंचा पराभव झाला. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते. तरे शिंदे गटात जातील असा अनुमान लावला जात होता. परंतु त्यांनी भाजपात प्रवेश केला.
तर दिवंगत माजी आमदार कृष्णा घोडा यांचे पुत्र शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनीही भाजपात प्रवेश करत धक्का दिला. २०१६ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. २०१९ विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारण्यात आली. तेव्हापासून अमित घोडा मागे पडले. परंतु अमित घोडा आणि विलास तरे यांच्या भाजपा प्रवेशाने पालघरमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. भाजपाच्या या खेळीमुळे उद्धव ठाकरेंसह शिंदे गटालाही धक्का बसला आहे.