ई-मेलद्वारे २ लाख ३० हजारांची फसवणूक
By admin | Published: April 8, 2017 01:48 AM2017-04-08T01:48:24+5:302017-04-08T01:48:24+5:30
टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, टी शर्ट व तीन कोटी ६५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट हे बक्षीस लागले असून आमचा एजंट दिल्ली विमानतळावर आला
राजगुरुनगर : ‘अभिनंदन! आपला मोबाईल क्रमांक लकी ठरला असून तुम्हाला टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, टी शर्ट व तीन कोटी ६५ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट हे बक्षीस लागले असून आमचा एजंट दिल्ली विमानतळावर आला आहे. तुम्ही हे बक्षीस ताबडतोब सोडवून घ्या,’ असा ई-मेल एका १९ वर्षीय युवकाला आला आणि त्या जाळ्यात सापडून त्याची चक्क २ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजगुरुनगर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेडच्या पूर्व भागातील एका महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला २० फेब्रुवारी रोजी वरीलप्रमाणे ई-मेलवर संदेश आला. वरील माल सोडविण्यासाठी कॅनरा बँकेतील एका खात्यावर १२,५०० रुपये भरा असा मेसेज आला. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याने गावातील बँकेतून त्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली.
रक्कम भरल्याबरोबर लगेचच त्याला मोबाईलवर कॉल आला, की तुमचा डीमांड ड्राफ्ट आरबीआय बँकेत जमा झाला आहे. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा ट्रान्सफर करण्यासाठी ३५,१०० रुपये भरा. यातील १० हजार रुपये त्या विद्यार्थ्याने पुन्हा बँकेत भरल्यानंतर त्याला एक कस्टमर आयडी दिला व नेटवर प्रोसेस सुरू करण्यास सांगितले. दुसरा खाते क्रमांक देऊन त्या खात्यावर ५५ हजार ९९९ रुपये भरण्यास सांगितले. २७ फेब्रुवारीला त्याने ही रक्कम दिलेल्या खात्यावर भरली. २८ फेब्रुवारीला पुन्हा बक्षिसाच्या रकमेवरील इन्कम टॅक्स ६२ हजार ३५० रुपये भरा असा ई-मेल आला. ही रक्कमही त्या विद्यार्थ्याने भरली. पुन्हा ३ मार्चला अॅन्टीटेररीस्ट कोडसाठी ८९ हजार रुपये भरा, असा ई-मेल आला. या वेळी दिलेल्या खाते क्रमांकावर त्याने ही रक्कम भरली. ५ मार्चला पुन्हा ३५,९९९ रुपये मागितले.
परंतु, या विद्यार्थ्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने ही रक्कम भरण्याचे टाळले. त्यानंतर ६ मार्चला त्याला कॉल आला की, तुम्ही शंभर टक्के प्रोसेस पूर्ण न केल्यामुळे तुमचा चेक रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर या विद्यार्थ्याने वारंवार त्या क्रमांकावर फोन करूनही त्याला उत्तर मिळाले नाही. परंतु, तोपर्यंत त्याचे दोन लाख ३० हजार रुपये वेगवेगळ्या बोगस खात्यांमध्ये भरले गेले होते. या फसवणुकीमुळे या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला नाहक आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.
(वार्ताहर)