सीईटीसाठी २ लाख ६८ हजार अर्ज
By admin | Published: May 4, 2016 02:59 AM2016-05-04T02:59:08+5:302016-05-04T02:59:08+5:30
राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे येत्या ५ मे रोजी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. यासाठी २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असता तरी
पुणे : राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे येत्या ५ मे रोजी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार आहे. यासाठी २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला असता तरी यंदाही ३० ते ४० हजार जागा रिक्त राहतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाता आहे.
महाराष्ट्राने जेईई परीक्षेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून राज्यातील अभियांत्रिकीचे प्रवेश जेईई परीक्षेतील गुणांच्या आधारे दिले जात होते. मात्र, राज्य शासनाने अभियांत्रिकीसह मेडिकल, फार्मसी यासारख्या व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी स्वत:ची सीईटी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा राज्यात सीईटी परीक्षा घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना १ मार्च ते २२ मार्च या कालावधीत आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी केवळ अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केले तर काहींनी अभियांत्रिकी आणि मेडीकल या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालयानलयाचे संचालक प्रविण शिनगारे म्हणाले, की राज्य शासनातर्फे घेतल्या जाणा-या मेडीकल सीईटीसाठी राज्यातील १ लाख ४१ हजार १४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच केवळ अभियांत्रिकीच्या सीईटीसाठी १ लाख २५ हजार ९८० आणि मेडीकल आणि इंजिनिअरिंग या दोन्हीच्या सीईटीसाठी १ लाख ४२ हजार २६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे हा अकडा २ लाख ६८ हजारांवर जातो. (प्रतिनिधी)
सीईटी प्रवेशासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने या अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढेलच असे नाही. विद्यार्थी सीईटी परीक्षा देतात. मात्र, लाखो रुपये खर्च करून नोकरी मिळेल का? ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला तेथे पायाभूत सुविधा आहेत का? या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यार्थी प्रवेश घेतात. यंदा राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्यात आली आहे. तरीही सुमारे ३० ते ४० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
- डॉ. वाय. पी. नेरकर, समन्वयक,
अभियांत्रिकी विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ