२ लाख शेतकऱ्यांना मेमध्ये दोनऐवजी ४ हजार मिळणार; पहिला हप्ता खात्यात होणार जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:27 PM2023-05-05T13:27:04+5:302023-05-05T13:27:17+5:30
सरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत.
मुंबई - प्रधानमंत्री किसान सन्मान निधीप्रमाणेच राज्य सरकारदेखील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवत आहे. त्याचा पहिला हप्ता केंद्राच्या योजनेसोबतच मे महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी चार हजार जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर होणार अंमलबजावणी
सरकारकडून ही योजना सुरू केल्यानंतर आता शेतकऱ्यांना वार्षिक १२,००० रु. मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ६, ००० रु. व नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत ६००० रु. अशी एकंदरीत १२,००० रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आहे.
मे महिन्यांत शेतकऱ्याला मिळणार दोनऐवजी चार हजार
दर चार महिन्याला केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००० रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येईल. या योजनेचा पहिला हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी वितरित केला जाईल, अशी माहिती दिली जात आहे.
राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक मदत द्यावी. यासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे.
९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ !
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ राज्यातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेसाठीच्या अटी, शर्ती व पात्रता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच असेल.