बदलीसाठी चंद्रकांत खैरेंच्या मुलानं घेतले होते २ लाख; Audio क्लीपनं झाला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 08:29 PM2023-01-30T20:29:06+5:302023-01-30T20:30:35+5:30
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या मुलानं बदलीच्या कामासाठी २ लाख रुपये घेतल्याचा आरोप होत आहे.
औरंगाबाद - शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांची ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लीपमधील समोरचा व्यक्ती ऋषिकेश यांना बदलीच्या कामासाठी दिलेले २ लाख रुपये परत मागतायेत. ते पैसे परत देण्यासाठी ऋषिकेश यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याचं दिसून येते. महाविकास आघाडी सरकार असताना हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसते.
काय आहे ऑडिओ क्लीपमध्ये?
ऋषिकेश खैरे - हॅलो
विजय ताकमोघे - बोला भाऊ
ऋषिकेश खैरे - काळेचा फोन आला होता, काय झाले?
विजय ताकमोघे - अरे हौ ना, तुम्ही दोघेपण हलक्यातच घेऊ लागले. एवढी परेशानी चालू आहे माझी. दोन अडीच वर्ष झाले पैसे देऊन. दोन लाख रुपये. काय बोलणार आहे बरं तुम्हाला. विशालदेखील काही रिस्पॉन्स देत नाही. तुम्ही रिस्पॉन्स नाही देऊ राहिले
ऋषिकेश खैरे - आज काय तारीख आहे. २३ तारीख आहे. पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो.
विजय ताकमोघे - आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो तेथून आता इथे आलो होतो.
ऋषिकेश खैरे - १०० टक्के होईल.
विजय ताकमोघे - तुम्हाला माहिती आहे का भाऊ, मी घरातील सोने-चांदीदेखील मोडले आहे. आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही. काय करायचं बरं सांगा तुम्ही. माझं कामदेखील बदलीचे झाले नाही. त्यानंतर दीड दोन वर्ष वायापण गेले.
ऋषिकेश खैरे - डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक तर काम करून देतो नाहीतर तुझे पैसे देतो.
विजय ताकमोघे - नै काम करूच नका. काम करून घेतो मी. आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी. तिकडे बदलीसाठी.
ऋषिकेश खैरे - अच्छा दिलेले आहे का. मग पैसे देऊन टाकतो
विजय ताकमोघे - तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरंच लय परेशानी चालू आहे माझी.
ऋषिकेश खैरे - डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय ताकमोघे - लास्ट तारीख ८ पकडू का मी?
ऋषिकेश खैरे - होय
विजय ताकमोघे - बरंय, ठीक आहे चालेल
ऑडिओ क्लीपच्या आरोपावर काय म्हणाले ऋषिकेश खैरे?
आमचे एक मित्र आहेत. त्यांच्यामार्फत एक जण आला होता. त्यांच्या मिसेसची ट्रान्सफर करून द्यायची आहे. तेव्हा ठाकरे सरकार असल्याने होय, आपण करून देऊ असं म्हटलं. त्यानंतर कोविड आला, हा सगळा गोंधळ झाला. शिंदे गट सत्तेत आले. त्यामुळे काम राहून गेले. जे काही पैसे असतील ते आपण देऊ असं स्पष्टीकरण ऋषिकेश खैरे यांनी दिले. परंतु यावरून बदल्यांसाठी मविआ सरकारमध्ये पैसे घेतले जात होते हा आरोप खरा ठरतोय या पत्रकाराच्या प्रश्नावर ऋषिकेश खैरे म्हणाले की, ते मी बोलू शकत नाही. समोरच्याला आपण काही देत असतो त्यासंदर्भात जो काही खर्च लागणारा असतो तो आपण मागितला होता असं त्यांनी स्पष्टीकरण दिले.