२ लाख २००० किमीचा सायकल प्रवास !
By Admin | Published: July 28, 2016 07:51 PM2016-07-28T19:51:03+5:302016-07-28T19:51:03+5:30
तरूणांना व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे हा त्यांचा उद्देश.. या एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन ते गावोगाव फिरले.. तब्बल २५ राज्यांमधल्या हजारो शाळा- महाविद्यालयांना भेट देऊन त्यांनी जनजागृती केली
ऋचिका पालोदकर
औरंगाबाद : तरूणांना व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे हा त्यांचा उद्देश.. या एकाच ध्येयाने प्रेरीत होऊन ते गावोगाव फिरले.. तब्बल २५ राज्यांमधल्या हजारो शाळा- महाविद्यालयांना भेट देऊन त्यांनी जनजागृती केली.. यासाठी त्यांनी दोन लाख दोन हजार किलोमीटरचा चक्क सायकलवर केलेला विक्रमी प्रवास.. गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली दखल.. आणि आता अमेरिकेला जाऊन ओबामांची होणारी भेट..
असा थक्क करणारा प्रवास करत आहेत मुळ कर्नाटकातल्या चिकातिरूपती या गावचे ५६ वर्षीय अमनदिपसिंग खालसा. प्रवास करत करत ते आता औरंगाबादेत आले आहेत. इथून शिंगणापूर, अहमदनगर, पुणे आणि बेंगलोर असा प्रवास करून ते मुळगावी जाणार आहेत. पुढील दोन महिन्यात ते अमेरिकेला रवाना होतील.
काही वर्षांपुर्वी जवळच्या एका नातेवाईकाचा दारूच्या आहारी गेल्यामुळे झालेला मृत्यु पाहून ते व्यथित झाले. यामुळे देशभरातील तरूणांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरवले आणि भ्रमंती सुरू केली. आसाम, नागालँड, मणिपुर ही राज्ये वगळता अख्खा भारतदेश त्यांनी सायकलववर फिरून पालथा घातला. १ जानेवारी २००८ पासून त्यांनी ही भ्रमंती सुरू केली. तेव्हापासून ते आजतागायत ते घरी गेलेले नाहीत. काही वर्षांपुर्वी त्यांच्या मुलीचे लग्न झाले, परंतू आपल्या ध्येयपुर्तीमध्ये अडथळा येईल म्हणून मुलीच्या लग्नाला जाणेही त्यांनी टाळले.
अमनदिप यांचे मुळ नाव महादेव रेड्डी. शीख धर्माने प्रेरित झाल्यामुळे १९७५ साली त्यांनी शीख धर्म स्वीकारला. पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, घरी जमीनजुमला असतानाही त्यांनी त्यांच्या ध्येयापायी घरदार सोडून प्रवासाला सुरवात केली. त्यांची पत्की शिक्षिका असून मुलगा अमेरिका येथे कान-नाक-घसा तज्ञ म्हणून कार्यरत आहे.
वॉट्सअॅप, टष्ट्वीटर, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटच्या माध्यमातून १० हजार पेक्षाही जास्त लोकांशी अमनदिपसिंग जोडलेले आहेत. ते ज्या गावात जातात तेथील शाळा- महाविद्यालयांना भेट देतात. व्यसनांमुळे जडणारे आजार, शरीरावर होणारे दुष्परिणाम याविषयी माहिती देणारी पत्रके विद्यार्थ्यांना वाटतात. लॅपटॉपवरही त्यांनी याविषयी एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
लवकरच अमेरिका वारी
अमनदिप यांनी अमेरिकेतील जॉन विल्सन यांचा १ लाख २५ हजार किमी एवढा सायकलवर प्रवास करण्याचा विक्रम मोडीत काढल्यामुळे त्यांनी गिनिज बुक मध्ये नोंद झाली आहे. गिनीज बुक नामांकनासाठी खालसा हे दोन महिन्यांनी अमेरिकेला जाणार आहेत. टष्ट्वीटरच्या माध्यमातून बराक ओबामा यांच्या संपर्कात असलेल्या अमनदिप यांना ओबामांनी भेटीचे आमंत्रण दिले आहे. अमेरिकेहून परतल्यावर त्यांच्यामुळ गावी गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. या त्यांच्या भ्रमंतीवर आधारित पुस्तक लिहिण्याचाही त्यांचा विचार आहे.
सायकलवरचा संसार
अमनदिपसिंग यांनी त्यांचा संसार सायकलवरच थाटला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, जेवण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, स्टोव्ह, मच्छरदाणी, अंथरूण, पांघरूण, लॅपटॉप यासगळ्या वस्तू सोबत घेऊन अमनदिप यांचा प्रवास सुरू आहे. दिवसभर प्रवास,रात्र होईल त्या ठिकाणी मुक्काम, स्वत:चे अन्न स्वत:च तयार करणे असा त्यांचा दिनक्र म आहे. दिवसभरात फक्त एकदाच जेवतात आणि रोज १०० ते १५० किमी प्रवास करतात.