कारखान्यांसाठी २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 05:03 AM2018-03-29T05:03:01+5:302018-03-29T05:03:01+5:30
देशातील अतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला.
चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : देशातील अतिरिक्त साखरेवर उपाय म्हणून केंद्र सरकारने बुधवारी साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला. जे कारखाने ठरवून दिलेली साखर निर्यात करतील, त्यांना आगामी तीन वर्षांत तेवढीच शुल्कमुक्त साखर आयात करण्याला मंजुरी देणारे धोरणही मंजूर करण्यात आले. मात्र, निर्यात अनुदानाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता असल्याचे समजते.
देशात यंदा २९५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. मागणी २५० लाख टन आहे. यामुळे देशात अतिरिक्त साखर होण्याच्या शक्यतेने साखरेचे दर गेल्या सहा महिन्यांपासून घसरत आहेत. बुधवारी २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल दर घाऊक बाजारात होता. ३२०० रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला तरच कारखाने उसाला एफआरपीप्रमाणे दर देऊ शकणार आहेत.