जिंतूर तालुक्यात २० कोटींचे बंधारे होणार
By Admin | Published: June 12, 2017 07:47 PM2017-06-12T19:47:55+5:302017-06-12T19:47:55+5:30
लघुसिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटी रुपये खर्च करून ६७ नवीन बंधारे होणार आहेत.
ऑनलाइन लोकमत
जिंतूर ( जि. परभणी), दि. 12 - तालुक्यात लघुसिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटी रुपये खर्च करून ६७ नवीन बंधारे होणार आहेत. यापैकी ३० बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बंधाऱ्याच्या कामाच्या निविदा भरण्यावरून राजकीय पक्षांमध्ये तू तू मै मै होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिंंतूर तालुक्यात लघु सिंचन पाटबंधारे विभागाच्या वतीने २० कोटीं रुपयांचे ६७ नवीन बंधारे उभाण्यात येणार आहेत. यातील २३ बंधाऱ्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तालुक्यातील कौसडी येथे ९० लाख ३० हजार, मोहखेडा येथे ५६ लाख, कोरवाडी ५७ लाख, करवली ८६ लाख, जांभरून ४० लाख, देवगाव धानोरा ३५ लाख, आडगाव बाजार १ कोटी २६ लाख, अंबरवाडी १ कोटी २ लाख, राव्हा १ कोटी १० लाख, गुळखंड १ कोटी १३ लाख, धामणगाव १ कोटी १७ लाख, वस्सा ६० लाख, दहेगाव ४० लाख, पिंपळगाव काजळे ६१ लाख, मांडवा ४० लाख, आसेगाव १ कोटी ९ लाख, बामणी ५० लाख, भोगाव ४१ लाख, मोळा ३५ लाख, निवळी खुर्द १ कोटी १७ लाख, पाचेगाव ४१ लाख, सांगळेवाडी ७० लाख, शिंदे टाकळी ४३ लाख, गुगळी धामणगाव ८२ लाख, शिंगटाळा ४० लाख, डासाळा ६४ लाख, जवळा ४३ लाख, डिग्रस ८२ लाख, अशी एकूण २३ कामे मंजूर झाली असून १३ कोटी ४० लाख ४३ हजार रुपयांची कामे कार्यारंभ आदेशासाठी लघु पाटबंधारे विभागाकडे आहेत. तालुक्यातील यापूर्वीच्या २५ ते ३० मोठ्या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.तसेच संबंधित कंत्राटदाराने बंधाऱ्याची कामे निकृष्ट केल्याने अनेक बंधारे लिकेज झाले आहेत.त्यामुळे साठवण क्षमता फारशी राहिली नाही. परिणामी कोट्यावधींचा खर्च होऊनही बंधारे मात्र कोरडेच राहिले आहेत.
खासदारांनीही केली तक्रार
खा. बंडू जाधव यांनी तालुक्यातील कोरवाडी, कुऱ्हाडी, सावंगी भांबळे, संक्राळा, कोक, रिडज, करवली येथील २०१६-१७ मध्ये झालेली बंधाऱ्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असंल्याची तक्रार कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे . तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून साखरतळा येथे झालेला बंधाराही निकृष्ट झाल्याची तक्रारही खा. जाधव यांनी केली आहे.
राजकीय गुत्तेदार सरसावले
तालुक्यात बंधाऱ्यांची कामे आपल्यालाच मिळावी, यासाठी राजकीय गुत्तेदार मोठी लॉबिंग करीत आहेत. इतर ठिकाणच्या गुत्तेदाराला कामे करता येऊ नये, यासाठी निविदा मॅनेज व दबाव टाकण्याचा प्रकार सर्रास तालुक्यात होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चांगले कंत्राटदार कामे करण्यास धजावत नसल्याचे दिसते. विशेष म्हणजे निविदा कोणालाही सुटल्या तरी कामे मात्र राजकीय गुत्तेदारच करतात. त्यामुळे दर्जाहीन कामात वाढ झाली आहे.
लघुसिंचन पाटबंधारे विभागांतर्गत ६७ कामांपैकी पहिल्या टप्प्यात २३ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित कामाचे आदेश लवकरच काढण्यात येतील. मात्र पावसानंतर ही कामे सुरू होतील.
- संजय पडलवार, कार्यकारी अभियंता