२० जागा द्या, वाद मिटवा
By admin | Published: August 4, 2014 03:26 AM2014-08-04T03:26:12+5:302014-08-04T03:26:12+5:30
महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे
पुणे : महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष गुलाम म्हणून नाही तर स्वाभिमान म्हणून आला आहे, असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीसाठी २० जागा हव्यात, या मागणीचा रिपब्लिकन पार्टीचे (रिपाइं) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी रविवारी पुनरुच्चार त्यांनी केला. १५ आॅगस्टपर्यंत जागांचा वाद मिटवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित सत्ता परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. लोकसभेत इतिहास घडविला, आता विधानसभेतही घडविणार असे सांगून आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितांची पेरणी करीत ‘आमचा समाज लढणारा आहे, पडणारा नाही. आम्हीच महायुतीचे खरे मावळे, बाकी सारे कावळे, त्यांना सध्या कोणी विचारत नाही’, असे वक्तव्य केले. कर्नाटक सरकारने मराठी भाषकांना मारहाण केल्याने मानवी हक्कांचे उल्लंघन झाले आहे. ही दादागिरी चालणार असेल तर केंद्राकडे कर्नाटक सरकार बरखास्तीची मागणी करू. सर्व पक्षीय एकमताने याविषयावर लढू आणि महाराष्ट्राची ताकद दाखवून देऊ, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)