शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 11:46 IST2025-01-01T11:45:06+5:302025-01-01T11:46:14+5:30
ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारला

शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला निर्णय
सातारा : ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागासाठी विविध संकल्पना राबवून या खात्याचे नाव उंचावण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
मंत्रालयात मंगळवारी महापुरुषांना अभिवादन करून जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल, आमदार सचिन पाटील, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अंकुशभाऊ गोरे, सोनिया गोरे, अरुण गोरे, भीमराव पाटील, किरण बर्गे, ओएसडी नारायण गोरे, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी, ऋषी धायगुडे, वैष्णवी गोरे, अदित्यराज गोरे आणि अधिकारी उपस्थित होते.
गोरे म्हणाले, माझा मतदारसंघ ग्रामीण भागात आहे. मी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. ग्रामीण भागाच्या विकासाबरोबर माझी नाळ जुळली आहे. गेली १५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना गावगाड्याबरोबर जोडला गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला याच विभागासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या काळात मंत्रिपदाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सोयीसुविधा आणखी सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्यात येणार आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवून वेगाने निर्णय घेऊन ग्रामविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी लखपती दीदी योजना प्रभावीपणे राबवून हे उद्दिष्ट १०० दिवसांत पूर्ण करणार आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणखी ५० लाख लखपती दीदी होणार आहेत.
पदभार स्वीकारताच सुरू केला कामाचा धडाका
जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास मंत्रालयाचा पदभार स्वीकारताच कामांचा धडाका सुरू केला. ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना सूचना करून शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचा रोडमॅप तयार केला. त्यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारताच माण-खटावसह जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.