वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मृताच्या वारसास मिळणार २० लाख; जखमींच्या नुकसान भरपाईमध्येही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:37 AM2022-08-25T06:37:37+5:302022-08-25T06:37:51+5:30
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवितहानी तसेच पाळीव प्राण्याच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारने वाढ केली आहे.
मुंबई :
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणारी मानवी जीवितहानी तसेच पाळीव प्राण्याच्या हानीच्या भरपाईमध्ये राज्य सरकारने वाढ केली आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून २० लाख रुपये देण्यात येणार आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत याबाबत घोषणा केली. गव्यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे राज्यातील अनेक भागात शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन याबाबतही भरपाई देण्याचा विचार करण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
वाघ, बिबट्या, रानडुक्कर, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, हत्ती आणि रानडुकरे आदी वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसास किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली असून यापुढे १५ लाख रुपयांऐवजी २० लाख रुपये इतके मदत देण्यात येणार आहे. यापैकी १० लाख रुपये संबंधित वारसास तत्काळ धनादेशाद्वारे आणि उर्वरित रक्कम १० लाख रूपये त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यामध्ये ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे.
हल्ल्यात कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस ५ लाख रुपये, गंभीर जखमीस १ लाख २५ हजार रुपये तर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येणार असून खासगी रुग्णालयात औषधोपचार केल्यास त्याची मर्यादा २० हजार रूपये प्रती व्यक्ती राहील.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सन २०१९-२० मध्ये ४७, २०२०-२१ मध्ये ८०, तर २०२१-२२ यावर्षी ८६ इतकी मानवी जीवितहानी झाली आहे.
गाय-बैलाचा मृत्यू झाल्यास मिळणार ७० हजार
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास देण्यात येणारी ६० हजार रूपयांची मदत वाढवून ती ७० हजार रूपये इतकी करण्यात आली आहे. मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास १० हजार रूपयांऐवजी १५ हजार रूपये मदत करण्यात येणार आहे.
- गाय, म्हैस, बैल या जनावरांना कायम अपंगत्व आल्यास १२ हजार रुपयांऐवजी १५ हजार रूपये, तसेच गाय, म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास ४ हजार रुपयांऐवजी ५ हजार रूपये एवढी नुकसान भरपाई देण्यात येईल.