नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

By admin | Published: December 31, 2016 03:42 AM2016-12-31T03:42:51+5:302016-12-31T03:42:51+5:30

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग

20% of Metro-III work in the new year | नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

नववर्षात मेट्रो-३ चे २०% काम करणार

Next

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नव्या वर्षात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३चे बांधकाम २० टक्के पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. सर्व स्थानकांच्या भिंती बांधणे, टनेल बोअरिंग मशिन्सच्या मदतीने सातही टप्प्यांत खोदकाम करणे; इत्यादी कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याचा कॉर्पोरेशनचा मानस असून, नव्या वर्षात काळबादेवी आणि गिरगाव येथील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चा करून सामंजस्याने सोडविण्यात येणार आहे.
टॅक्शन पॉवर सप्लाय कंत्राटाबरोबरच प्रणालीबाबतच्या निविदा मंजूर करण्यासह यापूर्वी मेट्रो-३ची १८ हजार कोटींपेक्षा अधिक किमतीच्या बांधकामांची कंत्राटे देण्यात आली. संपूर्ण ३३.५ किमी मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, भूगर्भ तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. मेट्रो-३च्या मार्गाच्या आसपास असलेल्या इमारतीच्या सद्य:स्थितीचे सर्वेक्षण सुरू आहे. जमिनीखालील सेवा जोखण्यासाठीचे खोदकाम प्रगतिपथावर असून, भिंती बांधण्यासाठी पायलिंगचे काम सुरू झाले आहे.
मेट्रो-३चे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहपोलीस आयुक्तांच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार गर्दीच्या वेळी वाहतूक नियमित ठेवण्यासाठी १ हजार ५०० प्रशिक्षित वाहतूक शिलेदारांची नेमणूक करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून, सरकारी जमिनीच्या ९० टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

- मेट्रो-३ची अंमलबजावणी करताना २ हजार ८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येणार आहे. यामध्ये १ हजार ८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक आणि ३९ रहिवासी-कम-व्यावसायिक व १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.
- मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे आजपर्यंत ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यांना नव्या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षात पर्यायी जागा देण्यात येणार आहे.

काळबादेवी आणि गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेत त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला आहे. सद्य:स्थितीमध्ये काळबादेवी आणि गिरगावमधील रहिवाशांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी चर्चा करून आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन

Web Title: 20% of Metro-III work in the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.