शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटे पेट्राेलपंप राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 01:32 PM2019-02-20T13:32:28+5:302019-02-20T13:45:39+5:30
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पेट्राेलपंप चालकांकडून अनाेखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
पुणे : पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना आपेले प्राण गमवावे लागले हाेते. सुरक्षायंत्रणांवरील हा सर्वात माेठा दहशतवादी हल्ला हाेता. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध नाेंदविण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पेट्राेल पंप चालकांकडून अनाेखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 7 ते 7.20 या वेळेत पेट्राेल पंप बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबराेबर पेट्राेल पंपावरील सर्व लाईट्स आणि कामकाज सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहे.
14 फेब्रुवारी राेजी काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला हाेता. हा हल्ला इतका भीषण हाेता की आजूबाजूच्या गावांमध्ये या स्फाेटाचा आवाज ऐकू गेला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यांनंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. दहशतवाद्यांचा बिमाेड करण्यासाठी सर्जिकल स्टाईकपासून ते पाकिस्तानला धडा शिकवावा अशी मागणी देशवासियांकडून करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर देशभरात शहीद जवानांना श्रद्धाजली वाहण्यात आली. त्याचबराेबर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरु झाला. जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतातील सर्वच पेट्राेलपंप आज संध्याकाळी 7 ते 7.20 या काळात बंद राहणार असून पेट्राेल पंपावरील लाईट्सही बंद करण्यात येणार आहेत.
याबाबत बाेलताना पुणे पेट्राेल डिलर असाेसिएशनचे समीर लडकत म्हणाले, पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज संध्याकाळी 7 ते 7.20 या वेळेत सर्व पेट्राेलपंप बंद ठेवण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळेत पेट्राेलपंपावरील सर्व कामकाज थांबविण्यात येणार आहे.