राज ठाकरेंच्या भाषणातील 40 पैकी 20 मिनिटे हिंदूत्वावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:20 PM2020-01-24T12:20:56+5:302020-01-24T12:44:06+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही.
मुंबई - मराठीचा मुद्दा घेऊन राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेच्या अधिवेशनापूर्वीच राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसारच राज यांचे भाषण झाले असून 40 पैकी 20 मिनिटे राज ठाकरे हिंदू-मुस्लीम यावरच बोलले.
प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा शिवसेना पक्ष राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेला आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारधारेचे लोक नाराज झाल्याचे बोलले जात होते. हा स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार ही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. अगदी त्याच दिशेने राज ठाकरे निघाले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी देशातील प्रामाणिक मुस्लीम आमचे असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रामाणिक मुस्लीम शोधणार कसं यावर ते काहीही बोलले नाही. उलट बाळासाहेबांप्रमाणे एपीजे अब्दुल कलाम आणि माजी क्रिकेटपटू जहीर खान यांचे उदाहरण द्यायला राज विसरले नाहीत. यावेळी त्यांनी एनआरसीवरून मुस्लीमांना लक्ष्य केले.
एनआरसी आणि नागरिकता संशोधन कायदा याविरुद्ध देशात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत. या मुद्दावर राज ठाकरे यांनी मुस्लिमांनाच लक्ष्य केले आहे. कलम 370 आणि राममंदिर यावरून मुस्लीमांमध्ये राग आहे. हा राग आंदोलनाच्या माध्यमातून एकत्रित बाहेर येत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. यावेळी राज यांनी घुसखोरीच्या मुद्दावर अनेक प्रश्न उपस्थित केले.