मविआचे २० आमदार महायुतीकडे?; देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची राऊतांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:58 PM2024-07-22T12:58:21+5:302024-07-22T12:59:54+5:30
अमित शाह सच्चे असाल तर तुम्ही पहिली देवेंद्र फडणवीसांची चौकशी करा, त्यांच्यामागे ईडी, सीबीआय लावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.
मुंबई - विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ३ उमेदवारांपैकी एकाचा पराभव झाला. या निवडणुकीत मविआची काही मते फुटली असा अंदाज आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांनी मविआचे २० आमदार महायुतीकडे आल्याने त्यांचा फुगा फुटला असं विधान केले. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधत देवेंद्र फडणवीसांच्या अटकेची मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, तुमचा भ्रष्टाचार, तुमचा पक्ष आणि हे सरकार भ्रष्टाचारातून आलेले आहे. पैसा फेको, तमाशा देखो असं आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात महाविकास आघाडीचे २० आमदार फोडले, हे चिंचोके देऊन फोडले का?, केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नकोय ना, मग देवेंद्र फडणवीसांना अटक करा. २० आमदार फोडले, फडणवीसांनी किती पैसे दिले, ईडी, सीबीआय चौकशी फडणवीसांच्या मागे लावा. तुम्ही सच्चे असाल ना, पहिली चौकशी देवेंद्र फडणवीसांची करा असं राऊतांनी अमित शाहांना आव्हान केले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली आणि मविआचा फुगा फुटला. आता महायुतीची मते फुटणारे, महायुतीचे आमदार फुटणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत असं त्यांचे नेते सांगत होते. महायुतीचे सोडा, तुमचेच २० आमदार आमच्याकडे कधी आले हे तुम्हाला कळालं नाही. त्यामुळे मविआचा फुगा फुटलाय असा टोला देवेंद्र फडणवीसांनी भाजपाच्या अधिवेशनात लगावला. त्यावर संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत पलटवार केला.
विधान परिषद निवडणुकीत मविआला धक्का
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीने ९ उमेदवार दिले होते तर मविआकडून ३ उमेदवार रिंगणात होते. मविआत काँग्रेसकडून १, ठाकरे गटाकडून १ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर महायुतीने पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरख, सदाभाऊ खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाने प्रत्येकी २ उमेदवार उभे केले. लोकसभेचा निकाल पाहता महायुतीची मते फुटतील असा दावा मविआकडून वर्तवला जात होता. परंतु या निवडणुकीत मविआचेच काही आमदार फुटल्याचे समोर आले. त्यावरून आता फडणवीस-राऊतांमध्ये शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.