शेतकरी कर्जमाफीसाठी २० हजार कोटी उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:29 AM2018-03-07T06:29:58+5:302018-03-07T06:29:58+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी देण्यासाठी खुल्या बाजारातून तब्बल २० हजार कोटींच्या कर्ज उभारणीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली.
शेतकरी कर्जमाफीसाठी सुमारे ३४,०२२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यापैकी सुमारे २० हजार कोटींची रक्कम खुल्या बाजारातून कर्जाच्या रूपात उभारण्यास परवानगी देण्याची विनंती राज्य सरकारकडून केंद्राकडे करण्यात आली होती. राज्य शासनाच्या या मागणीला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे. भाजपा सदस्य अपूर्व हिरे आणि अनिल सोले यांनी याबाबतचा तारांकीत प्रश्न विचारला होता.
शेतकरी कर्जमाफीसाठी शेतक-यांनी भरलेल्या आॅनलाईन अर्जातील माहिती आणि बँकांकडील माहिती यांची सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ताळमेळ घालून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. या यादीच्या आधारे पात्र शेतक-यांसाठी कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपोटी रकमा बँकांना पाठविण्यात येत आहेत. आतापर्यंत ३१.३३ लाख शेतक-यांच्या बँक खात्यांमध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र अर्जदार शेतक-यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी आपल्या सांगितले.